नागपूरLok Sabha Elections : नितीन गडकरी यांच्या विरोधात महाविकास आघाडी कुणाला उमेदवारी देणार याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे. यातच सोलापूरच्या एका उमेदवारानं थेट नितीन गडकरींना नागपुरात आव्हान देण्याचं ठरवलेलं दिसतंय. या उमेदवारानं आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळं लोकसभा निवडणुकीसाठी नागपुरात दाखल केलेला अर्ज हा राज्यातील पहिला उमेदवारी अर्ज ठरला आहे.
नितीन गडकरींविरोधात उमेदवारी अर्ज दाखल :लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील 5 मतदारसंघ पूर्व विदर्भातील जिल्हे आहेत. यासाठी आज अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यामुळं आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्याचं दिवशी कोण अर्ज दाखल करणार याकडं सर्व राज्याचं लक्ष लागलं होतं. त्यामुळं सोलापूरचे स्वामी व्यंकटेश्वरा स्वामी महाराज यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी थेट नितीन गडकरींविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. याशिवाय आंबेडकर राईट्स पार्टी ऑफ इंडियाचे उमेदवार विजय मानकर यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी पूर्ण केली आहे.
कोण आहेत व्यंकटेश्वर महास्वामी महाराज :व्यंकटेश्वर महास्वामी महाराज यांचं खरं नाव दीपक कटकधोंड आहे. ते कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्याच्या चडचड येथील रहिवासी आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढण्यास इच्छुक होते. भाजपाकडं त्यांनी उमेदवारी देखील मागितलेली होती. पण, नागपूर लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी यांना पूरक उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आल्याचं त्यांनी सांगितलंय. नितीन गडकरी यांच्यासाठी मतं मागणार असल्याचं देखील ते म्हणाले आहेत. मात्र, माझ्या उमेदवारीमुळे गडकरींना मदतच होईल, असा दावा महाराजांनी केलाय. त्यामुळं महाराज उमेदवारी अर्ज मागे घेणार का? हे देखील येणऱ्या काळात पाहावं लागणार आहे.