ठाणे : शेअर बाजारात गुंतवणूक केली तर अधिकचा नफा मिळेल, असं आमिष दाखवून भामट्यांनी ऑनलाईन माध्यमातून डोंबिवलीतील दोन नोकरदारांची दोन वेगळ्या घटनांमध्ये एकूण 1 कोटी 31 लाख रुपयांची फसवणूक केली. यातील एका नोकरदाराची 82 लाख 61 हजार, तर दुसऱ्या नोकरदाराची 48 लाख 77 हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत या फसवणुकीच्या घटना घडल्या असून या प्रकरणी फसवणूक झालेल्या नोकरदारांनी मानपाडा आणि टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत.
नेमकं काय आहे प्रकरण? : मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातील माहिती अशी की, फसवणूक झालेल्यापैकी एक नोकरदार आपल्या कुटुंबासह पलावा गृहसंकुल भागात राहतात. ते मुंबईत नोकरी करतात. जुलै महिन्यात त्यांच्याशी एका अनोळखी महिलेनं संपर्क साधला. शेअर बाजारात आपण गुंतवणूक केली तर आम्ही तुम्हाला डिसेंबर अखेरपर्यंत 700 टक्के नफा मिळून देऊ, असं आमिष दाखवलं. त्यानंतर संबधित महिलेनं गुंतवणुकीसंदर्भात विविध प्रकारची माहिती देऊन तक्रारदाराला एक लिंक पाठवली. तसंच दिलेल्या बँक खात्यावर टप्प्या-टप्प्यानं ऑनलाईन पद्धतीनं पैसे जमा करण्यास सांगितले.
तक्रार दाखल : त्याप्रमाणे तक्रारदारानं 82 लाख 61 हजाराची रक्कम संबंधितांकडं नोव्हेंबरपर्यंत भरणा केली. या रकमेवर तक्रारदारानं अधिकचा परतावा मागण्यास सुरुवात केली. मात्र, अनोळखी व्यक्ती मूळ रक्कम परत मिळण्यासाठी आणखी रक्कम भरण्यास तक्रारदाराला भाग पाडत होती. परंतु, गुंतवणुकीची मूळ रक्कम परत करण्यासाठी तक्रारदारानं तगादा लावला असता, त्याला अनोळखी व्यक्तींनी नकार दिला. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच, त्यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
दुसरी घटना : टिळकनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, तक्रारदार हे नोकरदार असून ते पाथर्ली भागात राहतात. तीन अनोळखी व्यक्तींनी तक्रारदाराला शेअर बाजार आणि आयपीओ गुंतवणुकीच्या माध्यमातून अधिकचा परतावा देण्याचं आमिष दाखवलं. या आमिषाला भुलून नोकरदारानं 48 लाख 77 हजार रुपये ऑनलाईन माध्यमातून दिलेल्या बँक खात्यावर जमा केले. ही रक्कम परत मिळण्यासाठी समोरील व्यक्तींकडून टाळाटाळ सुरू होताच, आपली फसवणूक झाल्याचं नोकरदाराच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी माहिती व तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केलाय.
हेही वाचा -