मुंबई Salman Khan House Firing Incident : सुपरस्टार अभिनेता सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने सोमवारी विशेष मोक्का न्यायालयात १ हजार ७३५ पानांचे आरोपपत्र दाखल केले. हा गोळीबार 14 एप्रिल रोजी सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये झाला होता. लॉरेन्स बिश्नोई हा या गोळीबाराचा मुख्य सूत्रधार साबरमती तुरुंगात बंद असून, त्याचा भाऊ अनमोल बिश्नोई आणि मित्र रोहित गोदारा कॅनडात लपलेले आहेत, अशी माहिती मिळत आहे.
आरोपपत्रात मोठा दावा :लॉरेन्स बिश्नोईला दहशत निर्माण करून चित्रपट सृष्टीतील व्यक्तींकडून तसेच व्यावसायिकांकडून पैसे उकळायचे होते, असा दावा पोलिसांनी आरोपपत्रात केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकूण 46 साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी दोघांचा मोक्का न्यायालयात कबुली जबाब नोंदवण्यात आला आहे. लॉरेन्स बिश्नोई त्याचा लहान भाऊ अनमोल बिश्नोई आणि त्यांचा सहकारी रोहित गोदारासह नऊ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. अनमोल आणि रोहित दोघेही परदेशात आहेत. तर लॉरेन्स गुजरातच्या साबरमती तुरुंगात आहे. या प्रकरणी लॉरेन्स बिश्नोईला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी राज्याच्या एसीएस होममार्फत केंद्र सरकारला पत्रही लिहिले असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिसांनी चार्जशीटमध्ये दावा केला आहे की, गुजरातमधील तापी नदीतून जप्त करण्यात आलेली दोन पिस्तुले आणि सलमान खानच्या घराजवळ सापडलेली पुंगळी फॉरेन्सिक चाचणीत जुळली होती, ज्यामध्ये ते एकच पिस्तूल असल्याचे समोर आले आहे.