सातारा : फ्लेक्सवर ट्रम्पेट चिन्हासमोर तुतारी लिहून आणि स्पीकरवर ऑडिओ क्लिप प्रसारित करून प्रचार केल्यानं माण-खटाव विधानसभा मतदार संघातील स्वराज्य सेनेचे उमेदवार सत्यवान ओंबासे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मतदार ओळख चिठ्ठ्या ताब्यात न घेतल्यानं कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील महिला मतदान अधिकारी तेजस्विनी कुंभार यांच्यावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे मतदानाच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
स्वराज्य सेनेच्या उमेदवारावर गुन्हा (Reporter) ट्रम्पेट चिन्हापुढं 'तुतारी' लिहून प्रचार :माण-खटाव मतदारसंघात स्वराज्य सेनेचे उमेदवार सत्यवान ओंबासे यांना निवडणूक आयोगाकडून ट्रम्पेट चिन्ह मिळालं आहे. प्रचारात फ्लेक्सवर ट्रम्पेट चिन्हासमोर कंसात तुतारी लिहून ते प्रचार करत असल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या निदर्शनास आलं. संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार यांच्यासह कार्यकत्यांनी ओंबासे यांच्या प्रचाराची गाडी वडूज पोलीस ठाण्यात आणली. त्यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडं तक्रार दाखल केली. त्यावरून वडूज पोलीस ठाण्यात उमेदवारासह वाहन मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वराज्य सेनेच्या उमेदवारावर गुन्हा (Reporter) कराडमध्ये मतदान अधिकारी महिलेवर गुन्हा दाखल :कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील मतदान अधिकारी महिलेनं (बीएलओ) मतदारांना वाटप करण्याच्या मतदार ओळख चिठ्ठ्या ताब्यात न घेता निवडणूक प्रक्रियेत अडथळा निर्माण केला. या प्रकरणी त्यांच्या विरोधात कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. तसेच त्यांच्यावर निलंबनाच्या कारवाईचा प्रस्तावही पाठवण्यात आला आहे. तेजस्विनी ऋषिकेश कुंभार (रा. पाटण कॉलनी, कराड) असं गुन्हा दाखल झालेल्या बीएलओचं नाव आहे. यासंदर्भात पर्यवेक्षक संग्राम प्रकाश गाढवे यांनी तक्रार दिली आहे.
निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणल्याचा ठपका :पर्यवेक्षक संग्राम गाढवे यांनी मतदार ओळख चिठ्ठया ताब्यात घेऊन त्या वाटप करण्याची सूचना करूनही मतदान अधिकारी तेजस्विनी कुंभार यांनी त्याला नकार देत निवडणूक कर्तव्य नाकारलं. निवडणूक कामकाजात हलगर्जीपणा केला. वारंवार सूचना देऊनही निवडणुकीचं कामकाज केलं नाही. फोन न उचलणं, नोटीशीला उत्तर न देता निवडणूक प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण केला. खुलासा करण्याचे आदेश देऊनही त्यांनी खुलासा सादर न केल्यानं निवडणूक कामात जाणीवपूर्वक अडथळा आणल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा :
- कळवा मुंब्र्यातील बंटीची 'घंटी' वाजवणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्धार
- विधानसभा निवडणूक 2024: महाविकास आघाडीला 150 पेक्षा जास्त जागा मिळतील, काँग्रेस अंतर्गत सर्वेक्षणातील निष्कर्ष