ठाणे FIR Against Akshay Shinde :बदलापूर चिमुकल्यांवर अत्याचार केल्याप्रकरणी अक्षय शिंदे या नराधमाचं ठाणे पोलिसांनी एन्काउंटर केलं आहे. या प्रकरणात आता विरोधकांकडून विविध आरोप करण्यात येत आहे. मात्र आता ठाणे पोलिसांनी नराधम अक्षय शिंदे याच्यावर पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर अक्षय शिंदे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी नराधम अक्षय शिंदे याच्यावर गुन्हा :पत्नीनं दाखल केलेल्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी ठाणे पोलिसांनी बदलापूर चिमुकल्यांच्या अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला बाहेर काढलं होतं. पोलीस त्याला चौकशीसाठी नेत होते. दरम्यान प्रवासात अक्षय शिंदे यानं सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांचं पिस्तूल हिसकावून पोलिसांवर गोळीबार केला. यावेळी पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी अक्षय शिंदे याच्यावर गोळीबार केला. यावेळी जखमी अक्षय शिंदे याला रुग्णालयात दाखल केलं असता, त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. अक्षय शिंदे यानं गोळीबार केल्यामुळे पोलिसांनाही गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे पोलिसांवर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी अक्षय शिंदे याच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंब्रा पोलीस ठाण्यात अक्षय शिंदे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.