नागपूरHusband Wife Suicide Case : पत्नीच्या उपचारासाठी केरळ राज्यातून नागपूरला आलेल्या एका दाम्पत्यानं आत्महत्या केली. तसेच त्यांच्या १२ वर्षीय मुलीलासुद्धा ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना नागपूर शहरातील जरीपटका पोलीस ठाणे हद्दीतील विजयश्री नगर नारा परिसरात घडलेली आहे. या घटनेमध्ये दाम्पत्याचा मृत्यू झाला असून मुलगी मात्र, थोडक्यात बचावली. तिच्यावर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय (मेयो) येथे उपचार सुरू आहेत.
उपचारासाठी आठवड्याला व्हायचा हजारोंचा खर्च :नागपुरातील जरीपटका भागात आत्महत्या करणाऱ्या दाम्पत्याची नावे रीजू विजयन उर्फ विजय नायर (४५) आणि प्रिया रीजू नायर (३४) अशी आहेत. आत्महत्या प्रकरणाचा जरीपटका पोलीस तपास करत आहेत. प्रिया रीजू नायर यांना रक्ताच्या कर्करोगाने ग्रासले होते. रीजू नायर यांनी प्रिया नायर यांच्यावर केरळ येथील रुग्णालयात उपचार केले; मात्र उपचारात फारसा फायदा होत नसल्यामुळं रीजू नायर हे पत्नी प्रिया आणि मुलगी वैष्णवीला घेऊन नागपूर शहरात आले. दोन महिन्यांपासून ते नागपूरमध्ये मुक्कामी होते. नागपुरातील एका खासगी पण महागड्या रुग्णालयात उपचार सुरू होते. दर आठवड्यात हजारो रुपयांचा खर्च उपचारात होत असल्यानं रीजू नायर आर्थिक विवंचनेत सापडले होते.
उपचारामुळे चढला कर्जाचा डोंगर :पत्नीच्या उपचारात जवळचे सर्व जमा पैसे संपल्यानंतर डोक्यावर कर्जाचा डोंगर तयार झाला होता. त्यामुळेच रीजू नायर यांनी पत्नीला ठार मारलं आणि मुलीला ठार करण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्यांनी स्वतःही आत्महत्या केली; परंतु रीजु नायर यांची १२ वर्षीय मुलगी थोडक्यात बचावली आहे.