मुंबई :मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथून एलिफंटा केव्हजला निघालेली बोट बुडाल्याची घटना घडली आहे. या अपघातात रात्री 8 वाजेपर्यंत 13 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. मृतांमध्ये नौदलाच्या एका कर्मचाऱ्याचा आणि नेव्हल क्राफ्टमधील दोघांचा समावेश आहे. तर १० प्रवाशी मृत्यूमुखी पडले आहेत. नौदलाचे जनसंपर्क अधिकारी कँप्टन मेहुल कर्णिक यांनी ही माहिती दिली आहे. या अपघातातील 10 जणांचे मृतदेह मोरा रुग्णालय, तर नेव्हल डॉकयार्ड रुग्णालया 2 तसंच जेएनपीटी रुग्णालय येथे 1 मृतदेह ठेवण्यात आला आहे. काही जखमींना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया -अपघातानंतर मुख्यमंत्री फडणवीस माहिती देताना म्हणाले,"मुंबई शहराजवळ अरबी समुद्रात नीलकमल कंपनीच्या एका प्रवाशी बोटीच्या अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेत सायं. 7.30 पर्यंत प्राप्त माहितीनुसार, बोटीतील एकूण प्रवाशांपैकी 101 लोकांना सुरक्षित वाचविण्यात आलं आहे. नौदलाचे व्हाईस ॲडमिरल संजय जगजित सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, नौदलाच्या डॉक्टरांनी सायंकाळी 7.30 पर्यंत 13 जणांना मृत घोषित केलं आहे. यात 3 नौदलाचे जवान असून 10 नागरिक आहेत. या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. 2 गंभीर जखमींना नौदल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो."
ते पुढे म्हणाले की, प्रसंगाचं गांभीर्य लक्षात घेता नौदल, कोस्टगार्ड, मुंबई पोलीस यांनी तातडीनं बचावकार्य हाती घेतलं. या बचावकार्यात नौदलाचे 11 क्राफ्ट आणि 4 हेलिकॉफ्टर्सची मदत घेण्यात आली. अद्यापही शोधकार्य सुरुच आहे. त्यामुळे सविस्तर माहिती उद्यापर्यंत प्राप्त होईल. मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल. या घटनेची नौदल आणि राज्य सरकारमार्फत चौकशी केली जाईल.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंत्रणा हलवली :या अपघातासंदर्भात बचावकार्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई शहर, रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतली. नौदल, जेएनपीटी, तटरक्षक दल आणि स्थानिक मच्छीमार बोटींच्या सहाय्यानं बचाव कार्याला वेग देण्याचे निर्देश देत सगळ्यांना सुरक्षित बाहेर काढा, असं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यंत्रणेला सांगितलं. एलिफंटा केव्हजला जाणाऱ्या फेरीबोटीच्या दुर्घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगड जिल्हाधिकारी किसन जावळे, मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून बचावकार्याची माहिती घेतली. त्याचबरोबर पोलीस उपआयुक्त (बंदरे) सुधाकर पाठारे यांच्याशीही दूरध्वनीवरून संवाद साधत माहिती घेतली.