वन्य प्राण्यांसह चोरट्यांपासून बचावासाठी मेळघाटात आगळावेगळा प्रयोग अमरावती Fencing for Farmers :रानडुक्कर, हरीण, काळवीट, नीलगाय यासह माकडांमुळं शेतातील पिकांचं नुकसान होत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून नेहमी केल्या जातात. या वन्य प्राण्यांकडून होणारं शेतीचं नुकसान हे प्रचंड स्वरुपाचं असून यावर तोडगा म्हणून शेतीला 'घायपात' आणि निवडुंगाचं कुंपण हे संरक्षण देणारं आहे. वन्य प्राण्यांसह शेतात चोरी करण्यासाठी येणाऱ्या चोरट्यांनाही हे काटेरी कुंपण शेतापासून दूर ठेवणारं असून अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात 'घायपात' आणि निवडुंगाच्या कुंपणाचं प्रशिक्षण आदिवासी बांधवांना दिलं जातंय. विशेष म्हणजे सर्वच भागातील शेतकऱ्यांसाठी 'घायपात' आणि निवडुंगाचं कुंपण सर्व दृष्टीनं फायद्याचे ठरणार असल्याचं मत तज्ज्ञांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केलंय.
'घायपात'चा काटा विंचवाच्या डंकसारखा : 'घायपात' या वनस्पतीचा शेतीला कुंपणासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं उपयोग केला जाऊ शकतो, अशी माहिती सेवानिवृत्त वन अधिकारी आणि वनस्पती तज्ञ सोमेश्वर करवाडे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिलीय. 'घायपात' या वनस्पतीला सर्वत्र अतिशय बारीक काटे असतात. हे सर्व काटे अतिशय घातक असून 'घायपात'च्या टोकावर असणारा काटा हा अतिशय भयानक स्वरुपाचा असून तो विंचवाच्या डंखासारखा वेदनादायी आहे. अतिशय भयंकर असणाऱ्या या काट्याच्या वेदनेमुळं वन्यप्राणी 'घायपात'च्या वाट्यालाच जात नाही. माकड देखील 'घायपात' आणि निवडुंग असणाऱ्या ठिकाणी येत नाहीत. त्यामुळं शेतकऱ्यांनी आपल्या शेताला 'घायपात' किंवा निवडुंगाचे कुंपण घातलं तर शेतमालाचं योग्यपणे संरक्षण होऊ शकतं असं देखील सोमेश्वर करवाडे म्हणाले.
'घायपात'ची लागवड कशी होते : अमरावती जिल्ह्यात मेळघाटमध्ये मोठ्या प्रमाणात जंगल आणि डोंगरावर 'घायपात' आढळते. तागाला वाळवून आणि सडून त्याचा ताग बनवला जातो. याच्यात तागापासून जी दोरी बनते ती अतिशय मजबूत असते तिला बेताची दोर म्हणतात. 'घायपात' हे बारमाही असून काही वर्षानंतर 'घायपात'चा मोठा खांब उंच वाढतो. या खांबाला फुलोरा येतो आणि खांबाच्या वरच रोप तयार होतात आणि ही रोप नैसर्गिकरीत्या जमिनीवर खाली पडल्यावर नव्यानं 'घायपाता'ची नैसर्गिक रित्या लागवड होते. याच्या फांद्या तोडून देखील याची लागवड होते, अशी माहितीदेखील सोमेश्वर करवाडे यांनी दिलीय.
- वृक्षलागवडीच्या ठिकाणी 'घायपात'चं कुंपण :मेळघाटात वनविभाग आणि सामाजिक वनीकरणाच्या वतीनं ज्या ज्या भागात वृक्षारोपण करण्यात आलंय, त्या भागात 'घायपात'चा वापर कुंपण स्वरुपात करण्यात आलाय. चिखलदरा, घटांग, रायपूर यासह मेघाटातील अनेक भागात पूर्वी वृक्षारोपण केल्यावर 'घायपात'चं कुंपण करण्यात आलंय. ते कुंपण आजदेखील चांगल्या अवस्थेत आहेत.
मेळघाटात निवडुंग लागवडीचा प्रयोग :'घायपात' प्रमाणेच उंच वाढणारं निवडुंगदेखील शेतीच्या रक्षणासाठी कुंपणाप्रमाणं उपयुक्त ठरणारे आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात येणाऱ्या खापरवाडी बुद्रुक येथील प्रयोगशील शेतकरी जगन बगाडे यांनी आपल्या शेताला निवडुंगाचं कुंपण केलंय. त्यांच्याप्रमाणेच मेळघाटातील आदिवासी बांधवांच्या शेत पिकांचं वन्य प्राण्यांपासून संरक्षण करता यावं यासाठी पाणी फाउंडेशनच्या पुढाकारानं चिखलदरा तालुक्यात चुरणी काटकुंभ परिसरात असणाऱ्या पलशा या गावात राम किशोर चिमोटे यांच्या शेतात निवडुंगाची लागवड करण्यात आलीय. पाणी फाउंडेशनचे शिवहरी टेके, वैभव नायसे आणि पंढरी हेगडे यांनी यासंदर्भात लगतच्या दहेन्द्री, कुलंगणा, काजलडोह ,काटकुंभ येथील शेतकऱ्यांना या संदर्भात मार्गदर्शन केलंय.
निवडुंगाचं कुंपण आर्थिक दृष्ट्या फायद्याचं : वन्य प्राण्यांपासून संरक्षणासाठी एक एकर शेताला ताराचं कुंपण घालण्यासाठी 50 हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. निवडुंगाचं एक एकर शेताला कुंपण घालण्यासाठी केवळ सात ते आठ हजार रुपये खर्च येतो, अशी माहिती पाणी फाउंडेशनचे वैभव नायसे यांनी 'ईटीव्ही भारत"शी बोलताना दिलीय. जंगलातून तोडून आणल्यावर निवडुंगाची लागवड शेताच्या धुर्यावर कुंपणासाठी कशी करायची याबाबत आम्ही शेतकरी बचत गटाच्या सदस्यांना प्रशिक्षण दिलं आणि त्यांना प्रात्यक्षिक देखील करुन दाखवल्याचंही वैभव नायसे म्हणाले.