पुणे Father Son Drowned In Maval :लाडक्या बाप्पाला निरोप देताना पिता-पुत्रावर काळानं घाला घातल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. अवैध उत्खनन केलेल्या खाणीत गणपती बुडवताना पाण्याचा अंदाज न आल्यानं बाप लेकाचा बुडून मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना मावळ तालुक्यातील बेडसे इथं घरघुती बाप्पाचं विसर्जन करताना गुरुवारी सायंकाळी घडली. संजय धोंडू शिर्के आणि आदित्य संजय शिर्के अशी बुडून मृत्यू झालेल्या बापलेकांची नावं आहेत. वन्यजीव रक्षक आणि आपदा मित्र मावळ या रेस्क्यू टीमच्या मदतीनं दोघांचेही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहेत. या पथकाच्या वतीनं रात्री दीड वाजतापर्यंत पाण्यात शोध घेऊन मृतदेह बाहेर काढण्यात आले. बाप लेकाचा मृत्यू झाल्यानं गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
घराजवळच्या अवैध खाणीत करत होते बाप्पाचं विसर्जन :मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सर्वत्र लाडक्या बाप्पाला भक्तिभावात निरोप देण्यात येत होता. यावेळी बेडसे गावातील संजय धोंडू शिर्के आणि आदित्य संजय शिर्के हे आपल्या लाडक्या बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी घराजवळच्या खाणीवर गेले होते. यावेळी आरती झाल्यानंतर मोठ्या भक्तीभावानं बाप्पाला निरोप देण्यात येत होता. बाप्पाला घेऊन आदित्य हा पाण्यात गेला होता. मात्र तो बराच वेळ झाला तरी, पाण्यातून वर न आल्यानं त्याचे वडील संजय शिर्के यांनी पाण्यात उडी घेतली.