महाराष्ट्र

maharashtra

14 वर्षांनी बाप झाल्याचा आनंद, पण गरिबीनं घात केला; रुग्णालयाच्या बिलामुळे जुळ्या मुलांच्या वडिलांची आत्महत्या - Navi Mumbai Crime

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 28, 2024, 5:24 PM IST

Mumbai News : नवी मुंबईतील तेरणा रुग्णालयानं बिलाचा तगाद्या लावल्यानं जुळ्या मुलांच्या वडिलांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तेरणा रूग्णालयाविरोधात नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

Navi Mumbai Crime
जुळ्या मुलांच्या वडिलाची आत्महत्या (Source - ETV Bharat)

नवी मुंबई Terna Hospital :आपल्या जुळ्या मुलांच्या उपचारासाठी झटणाऱ्या बापावर डॉक्टरांच्या मनमानी कारभारामुळं टोकाचं पाऊल उचलण्याची वेळ आली. 14 वर्षांनी पितृसुख लाभलेल्या बापानं रुग्णालयाच्या तगाद्यामुळं स्वतःला संपवल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईत घडली. नवी मुंबईतील तेरणा रुग्णालयाविरोधात नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

नेमकं प्रकरण काय? : नरेंद्र गाढे आणि वंदना गाढे हे दांपत्य पोट भरण्यासाठी नवी मुंबईत आलं होतं. ते काही वर्षांपासून नवी मुंबई नेरूळ येथील शिरवणे गावात राहत होते. नरेंद्र गाढे हे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाचनालयात सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होते. लग्नाला 14 वर्षे होऊनही घरात पाळणा हलत नव्हता. त्यामुळं या दांपत्यानं अनेक वर्षे उपचार घेतले होते. तब्बल 14 वर्षांनी गाढे दांपत्याला माता-पिता होण्याचं सुख लाभलं. गुरुवारी नरेंद्र गाढे यांच्या पत्नीनं नवी मुंबई नेरूळ येथील तेरणा फर्टिलिटी अँड रिसर्च सेंटर येथे जुळ्या बाळांना जन्म दिला. मात्र, डॉक्टर सतत पैशासाठी तगादा लावत असल्यामुळं व आर्थिक विवंचनेत सापडलेल्या नरेंद्र यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

बाळांना ठेवलं अतिदक्षता विभागात : नरेंद्र गाढे व वंदना गाढे या दांपत्याला तब्बल 14 वर्षांनी झालेली ही जुळी बाळ तब्येतीनं नाजूक होती. त्यामुळं त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं होतं. रुग्णालयाच्या बिलापोटी गाढे यांनी सुरुवातीला 45 हजार रुपये भरले. त्यानंतर 90 हजार रुपये बिल भरलं. मात्र, बिलाचा आकडा दिवसेंदिवस वाढतच होता. त्यामुळं त्यांनी पत्नीचा रुग्णालयातून डिस्चार्ज घेतला. मात्र, त्यांची जुळी बाळ उपचारासाठी अतिदक्षता विभागातच होती. गाढे यांनी एक लाख 35 हजार रुपये बिल भरूनही तेरणा रुग्णालयाचे डॉक्टर आणखी दीड लाख रुपये बिल भरा, असं फोन करून त्यांना वारंवार सांगत होते. बिल भरले नाही तर तुमची दोन्ही बाळ व्हेंटिलेटरवरून काढण्यात येतील, अशी धमकी देखील डॉक्टर देत होते. अखेर रुग्णालय प्रशासन आणि परिस्थितीसमोर हतबल झालेल्या नरेंद्र गाढेंनी टोकाचं पाऊल उचललं. नरेंद्र गाढेंनी आत्महत्या केली. याप्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

सुसाईड नोट आली समोर : नरेंद्र गाढेंनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. ज्यात त्यांनी "रुग्णालयानं बिलासाठी वारंवार तगादा लावला होता. आपल्या मृत्यूला रुग्णालय प्रशासनाला जबाबदार धरावं," असं लिहिलं. नरेंद्र गाढे नेरुळमधील मनपा वाचनालयात सुरक्षारक्षकाचं काम करत होते. लग्नानंतर तब्बल 14 वर्षांनी नरेंद्र गाढेंच्या घरात पाळणा हलला होता. पण, रुग्णालय प्रशासनाच्या तगाद्यामुळे 14 वर्षांनी मिळालेल्या आनंदावर पाणी फिरलं. याप्रकरणी रूग्णालयाविरोधात नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

वरील सर्व आरोप हे आत्महत्या केलेल्या व्यक्तीनं सुसाईड नोटच्या माध्यमातून रुग्णालयावर केले आहेत. संबंधित रुग्णालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केले पण संपर्क होऊ शकला नाही.

हेही वाचा

  1. डॉक्टरी व्यवसायातून वाद: डॉक्टरच्या कारवर गोळीबार करणारे चार आरोपी अटक, मुख्य आरोपी डॉक्टरसह दोन जण फरार - Thane Firing Case
  2. बनावट पासपोर्टवर केला होता पाकिस्तानचा दौरा; दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी - FAKE PASSPORT CASE

ABOUT THE AUTHOR

...view details