नागपूर : पूर्व वैमनस्यातून झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बाप-लेकाचा रात्री मृत्यू झाला आहे. ही घटना नागपूर शहरातील अजनी पोलीस स्टेशन हद्दीतील रामटेकेनगर या भागात घडली आहे. विजय सावरकर आणि मयूर सावरकर असं मयत बापलेकाचं नाव आहे.
कडेकोट पोलीस बंदोबस्त असतानाही गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ : नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात असतानाही गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्यानं वाढ होताना दिसत आहे. काल रात्री शुक्रवारी (20 डिसेंबर) शताब्दी चौक ते बेसा दरम्यान रामटेकेनगर येथे बाप-लेकावर जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यात दोघांचाही मृत्यू झाला आहे. हल्ल्याची घटना घडल्यानंतर विजय सावरकर आणि मयूर सावरकर यांना गंभीर अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पूर्व वैमनस्यातून हा जीवघेणा हल्ला करण्यात आला होता, अशी माहिती समोर आली आहे.
जुन्या वादातून हल्ला, हल्लेखोर झाला जखमी : विजय सावरकर यांचं अजनी पोलीस ठाणेच्या हद्दीतील रामटेकेनगर भागात फर्निचरचं दुकान असून ते काल रात्रीच्या सुमारास दुकानात असताना चार ते पाच हल्लेखोर त्यांच्या दुकानात आले. जुन्या वादा संदर्भात बोलायचं आहे, असं सांगून आरोपींनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. हल्लेखोरांपैकी एक हल्लेखोर गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे, तर एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतलं आहे.
दोन दिवसांपूर्वी झाली होती तक्रात : सावरकर बाप-लेकावर हल्ला करणाऱ्या आरोपींसोबत झालेल्या वाद प्रकरणी दोन दिवसांपूर्वी पोलीस स्थानकात एक तक्रार दाखल झाली होती, अशी माहिती समोर आली आहे. त्यानंतर काल रात्री त्यांच्यावर हा जीवघेणा हल्ला झाला, ज्यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला आहे. याप्रकरणी अजनी पोलीस पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा
- प्रेक्षकांनी पाठ फिरवली तरी नाना पाटेकरांचा 'वनवास' सुरू, पहिल्या दिवशी जमला 'इतका' गल्ला
- बीडचं प्रकरण सत्ताधारी पक्षाच्या नेत्याशी निगडीत असल्यानं दाबलं जाणार का? बाळासाहेब थोरात यांचा सवाल
- मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याचा शिवसेना उबाठाची तयारी; नाना पटोले म्हणाले मग संजय राऊतांना कोणी अडवलं ?