नाशिकRoad Accident Nashik: नाशिकमध्ये अपघाताच्या घटना सातत्याने घडत आहेत. अशात आज 5 एप्रिलला दुपारच्या सुमारास नाशिक-दिंडोरी मार्गावर बोलेरो गाडी आणि दुचाकीची जोरदार धडक झाली. यात दुचाकी वरील दोन आणि बोलेरो गाडीतील तिघांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत म्हसरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपघातात दोन्ही गाड्यांचा चक्काचूर :याबाबत मिळलेली माहिती अशी की, आज 5 एप्रिल दुपारच्या सुमारास नाशिक-दिंडोरी महामार्गवरील ढकांबे गावाजवळ बोलेरो कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. बोलेरो गाडीचे टायर फुटल्याने वाहन चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडीने दुचाकीला धडक दिली. यानंतर ही गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या बाभळीच्या झाडावर जाऊन आदळली. अपघात इतका भीषण होता की, दुचाकी आणि बोलेरो गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. घटनेची माहिती मिळताच दिंडोरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीने तीन गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. तर मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले.