अमरावती : शेती करणं परवडत नाही. आता शेतीमध्ये काही खरं नाही, असं रडगाणं गाण्याऐवजी शेतीतच खरं भविष्य आणि समृद्धी असल्याचा विश्वास ठेवत अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुक्यात येणाऱ्या कारला या गावात शेतकऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नानं शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी कंपनी थाटलीय. तसंच आपण केलेला प्रयोग इतर शेतकऱ्यांनाही कळावा यासाठी आपल्या गावातच जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी देखील या शेतकऱ्यांनी घेतलीय. शेतकऱ्यांनी प्रयोगशाळेत नेमके काय प्रयोग केलेत? या प्रयोगामागचा नेमका उद्देश आणि लाभ या संदर्भात 'ईटीव्ही भारत'चा हा स्पेशल रिपोर्ट.
शाळेतील शिक्षक झाले शेतीचे 'मास्टर' : कारला या गावात सुमारे 25 वर्षांपासून एक विनाअनुदानित शाळा सुरू होती. या शाळेत सलग सात ते आठ वर्ष गावातील राजू खरबडे यांनी शिक्षक म्हणून काम केलं. मात्र, तीन ते चार वर्षांपूर्वी ही शाळा अचानक बंद झाली. ही जागा मुळात राजू खरबडे यांच्याच मालकीची असल्यानं विद्यार्थ्यांची शाळा बंद झाल्यावर त्यांनी या शाळेच्या इमारतीत शेतकऱ्यांची शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हळू-हळू त्यांनी या शाळेचं रुपांतर शेती शाळेमध्ये केलं. या शाळेच्या इमारतीत खास प्रयोगशाळा उभारण्यात आली असून या प्रयोगशाळेत जैविक शेतीसाठी उपयुक्त घटक तयार केले जातात.
दर्जेदार सेंद्रिय शेतीसाठी शेतकऱ्यांनी उभारली कंपनी (ETV Bharat Reporter) शेतकऱ्यांचा गट ते कंपनी पर्यंतचा प्रवास : आपण एकट्यापुरतं मर्यादित राहून शेतीत प्रयोग करण्याऐवजी सामूहिक शेती केली तर गावात इतर शेतकऱ्यांनाही लाभ मिळेल. हा विचार ठेवून राजीव खरबडे यांनी सुरुवातीला 20 शेतकऱ्यांचा कारला सेंद्रिय शेतमाल उत्पादन गट तयार केला. यामध्ये हळू-हळू शेतकऱ्यांची संख्या वाढायला लागली आणि शेतकऱ्यांच्या गटाची संख्या 20 पर्यंत पोहोचली. त्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून 'मृगधारा फार्मर प्रोड्युसर कंपनी' सुरू केली. शेतकऱ्यांना प्रयोगासाठी निविष्ठांची गरज भासते. यामुळं आम्ही एक एक करून विविध पदार्थ प्रयोगाच्या माध्यमातून निर्माण केलेत, असं राजीव खरबडे 'ईटीव्ही भारत' शी बोलताना म्हणाले.
अशी केली जाते जैविक शेती : "शेतीमध्ये रासायनिक निविष्ठा वापरायची नाही, हा जैविक शेतीचा प्रमुख नियम आहे. अशा परिस्थितीत शेतीसाठी आवश्यक असणारी निविष्ठा तयार करण्यासाठी कृषी विभागाच्या योजनेतून आम्ही 'मृगधारा फार्म लॅब' उभारली. या लॅबमध्ये आम्ही ट्रायकोडर्मा अर्थात बुरशी तयार करतो. ट्रायकोडर्मा बनवण्याची संपूर्ण विधीही शेतकऱ्यांना या ठिकाणी सांगितली जाते. निंबोणी अर्क, दशपर्णी अर्क हे कीटकनाशक या ठिकाणी तयार केले जातात. अमिनो अॅसिड देखील याच ठिकाणी तयार होतं. इथं तयार करण्यात आलेले घटक दर्जेदार असल्याचं स्वतः शेतकरी सांगतात. तसंच या ठिकाणी असणाऱ्या मायक्रोस्कोपद्वारे ते पडताळणी देखील करू शकतात." तसंच इथल्या प्रॉडक्टमध्ये किती प्रमाणात ट्रायकोडर्मा आहे हे शेतकऱ्यांना कळायला हवं. यासाठी आवश्यक सुविधा करण्यात आल्याचंही खरबडे यांनी सांगितलं.
शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर : "सेंद्रिय शेती करताना नेमकी कोणती काळजी घ्यायला हवी? यासंदर्भात महिनाभरापूर्वीच मोर्शी तालुक्यातील 80 शेतकऱ्यांना या ठिकाणी आयोजित शिबिरात मार्गदर्शन करण्यात आलय. सेंद्रिय शेतीसाठी शासकीय योजनांचा लाभ कसा मिळवायचा? शेणखत नेमकं कसं कुजवायचं? कोणते बॅक्टेरिया शेतीसाठी उपयुक्त आहेत? अशा अनेक प्रश्नांचं उत्तर शेतकऱ्यांना या शिबिरात मिळतं", असं राजीव खरबडे म्हणाले.
सेंद्रिय शेतीचा असा होतो लाभ : पुढं खरबडे म्हणाले, "सेंद्रिय शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठा शेतकऱ्यांना अतिशय स्वस्त दरात या ठिकाणी मिळतात. तसंच या निविष्ठा स्वतः शेतकरी आपल्या शेतात देखील तयार करू शकतात. यामुळं खरंतर शेतकऱ्यांचा शेतीवर होणारा खर्च कमी होतो. सेंद्रिय शेतीमध्ये एकदमच उत्पादनात वाढ होईल असं म्हणता येणार नाही. त्यासाठी निश्चितच वेळ लागतो. मात्र, पूर्वीच्या तुलनेत शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ आणि खर्चात घट होत असल्याचं बघायला मिळतंय." तसंच नव्या पिढीचं आरोग्य आणि शेतकऱ्यांचं भविष्य हे सेंद्रिय शेतीतच आहे, असा विश्वासही राजीव खरबडे यांनी यावेळी व्यक्त केला.
हेही वाचा -
- कराडमध्ये भरलंय 'यशवंत कृषी प्रदर्शन', आधुनिक तंत्रज्ञानाची मेजवानी, कधीपर्यंत आहे सुरू?
- 'इंद्रायणी भाताचं हब'! संपूर्ण गावच करतंय भाताची शेती, पाहा स्पेशल रिपोर्ट
- प्राध्यापकाची नोकरी सोडून 'विषमुक्त शेती'; पत्नीही देते मुंबईकरांना जेवणाचा आस्वाद - Successful Farmer