अमरावती Amravati News : 'कृषीप्रधान राष्ट्र' अशी आपल्या देशाची ओळख असली तरी आजच्या घडीला अनेक शेतकऱ्यांसाठी शेतीत 'अर्थ' राहिला नाही. तसंच शेतीसाठी लागणारा खर्च आणि निघणारं उत्पन्न यांचा ताळमेळच बसत नाही. त्यामुळे शेती करणं फार कठीण झालंय, अशी व्यथा अमरावती जिल्ह्यात चांदूरबाजार तालुक्यातील शेतकऱ्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केलीय.
अशा आहेत अडचणी : "पाणंद रस्त्यांचा मोठा गाजावाजा झाला असला तरी शेतकऱ्यांना आजही आपल्या शेतात जाण्यासाठी अनेकदा पावसाळ्यात चिखलात फसतच मार्ग काढावा लागतो. शासनानं काही पाणंद रस्ते मंजूर केले. पण, त्या रस्त्यांची कामेच झाली नसल्यानं शेतकऱ्यांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागते, अशी नाराजी चांदूरबाजार तालुक्यातील माधान गावातील शेतकरी सतीश भटकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी व्यक्त केली. "केवळ रस्ता नसल्यामुळं गतवर्षी शेतातील दहा लाख रुपयांचा संत्रा शेतातच वाया गेला," अशी खंतदेखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.
अमरावती शेतकरी व्यथा (ETV Bharat Reporter) अतिवृष्टीमुळं गाळ गेला वाहून : "चार दिवसांपूर्वी अतिवृष्टी झाल्यामुळं माधानसह लगतच्या सोनोरी , करजगाव, शिरजगाव, चांदूरबाजार, काजळी, देऊरवाडा या गावातील अनेकांची शेतं पाण्यामुळं खरडून निघाली. शेतीसाठी उपयुक्त असणारा गाळ वाहून गेल्यामुळं शेतीमध्ये कस राहिला नाही. यामुळं उत्पन्नात घट होतं आहे," सतीश भटकर यांनी सांगितलं. "पूर्वी शेती कामासाठी गावातील अनेक लोक यायचे. मात्र शेतात कामं करायला मजूर सापडत नाहीत. सरकारकडून विविध योजनेअंतर्गत गरिबांना महिन्याकाठी आर्थिक लाभ दिला गेला तर भविष्यात शेतीसाठी मजूर सापडणार नाही. त्यामुळं शेतीचं पार वाटोळं होईल," अशी भीतीदेखील सतीश भटकर यांनी व्यक्त केली. गावातील अनेक सुशिक्षित तरुण मागील काही वर्षांपासून शेती करण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहेत. मात्र, तरीही हवं तसं उत्पन्न मिळत नसल्यानं शेती सोडून बाहेर काम करावं, अशा भावना तरुण शेतकरी व्यक्त करत आहेत.
संत्र्याची अडीच लाख झाडं तोडली : पुढं ते म्हणाले की, "गेल्या वीस वर्षांपासून भरमसाठ उत्पन्न देणारं संत्रा हे फळही आता संकटात सापडलंय. कधी संत्रावर येणारी कीड तर कधी अतिवृष्टीमुळं गळून जाणारा संत्रा यामुळं बागायतदार अडचणीत आहेत. वर्षाकाठी जितका पैसा संत्र्यासाठी खर्च करतात, तेवढा पैसादेखील त्यांना परत मिळत नाही. त्यामुळं मागील दोन वर्षांमध्ये माधान या गावातील तब्बल अडीच लाख झाडं कापून टाकण्यात आली."
सोयाबीनचा पर्यायदेखील संपला : "कापसासाठी मजूर मिळणं कठीण आहे. मजूर मिळाले तरी एकूणच लागवड आणि मजुरी हा खर्च पाहता शेतकऱ्यांच्या हातात काहीच शिल्लक राहत नाही. यावर पर्याय म्हणून सोयाबीनचे उत्पन्न घेण्याकडं शेतकऱ्यांनी प्राधान्य दिलं. मात्र, सोयाबीनचं उत्पन्नही चार-पाच क्विंटलच्यावर जात नाही. एकूणच खर्च आणि उत्पन्न पाहता शेतकरी तोट्यातच आहेत. परंतु, जगण्यासाठी काम करावंच लागले. त्यामुळे शेतकरी कसेबसे मोठ्या आशेनं शेतात राबत आहेत, अशी उद्विग्न भावना शेतकरी भटकर यांनी व्यक्त केली.
हेही वाचा -
- आधी पावसाची प्रतीक्षा, आता धो-धो; शेतात तळं तयार झाल्यानं बळीराजा संकटात - Heavy Rain in Amravati
- कोल्हापुरातील भावंडांची कमाल; 'नामधारी काकडी'च्या शेतीतून मिळवलं लाखोंचं उत्पन्न - Cucumber Farming Success Story
- शेतकऱ्यांना कर्जमाफीसह वीजबिल माफ करा - विजय वडेट्टीवार - Loan waiver to farmers