मुंबई: मनोरंजन क्षेत्राची राजधानी म्हणूनही मुंबईची ओळख आहे. ही राजधानी एका नव्या स्कॅमने हादरली असून याचा फटका सिनेसृष्टीतील अनेकांना बसला आहे. हे स्कॅम आहे दादासाहेब फाळके पुरस्काराचं. दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या नावाने एक संस्था सुरू करण्यात आली. त्याद्वारे हा पुरस्कार देण्याची आमिष दाखवून अनेकांची फसवणूक करण्यात आली आहे. गेल्या ८ वर्षांपासून हा बोगस पुरस्कार अनेक दिग्गजांना देण्यात आला आहे. याप्रकरणी संस्थेचे संस्थापक आणि व्यवस्थायकीय संचालक अनिल मिश्रा आणि त्यांचा मुलगा अभिषेक मिश्रा यांच्या विरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सोहळ्याच्या एका जोडप्यासाठी तिकीटाची किंमत २.५० लाख रुपये ठेवण्यात आली असून ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून तिकीट विक्री करण्यात येत आहे. ही बोगस विक्री करून जनतेची तसेच सरकारची फसवणूक करण्यात येत असल्याचा आरोप मिश्रा यांच्यावर आहे.
काय आहे प्रकरण? : १९ आणि २० फेब्रुवारी २०२५ रोजी वांद्र पश्चिम येथील हॉटेल ताज लॅण्ड्स एण्डस येथे दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार या नावाने एक सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती प्रसिद्ध करण्यात आली होती. अनिल मिश्रा आणि त्यांची पत्नी पार्वती मिश्रा हे या आयोजक कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. या कंपनीने ३० मे २०२४ रोजी वांद्रे पोलीस ठाण्याकडून परवानगी घेतली होती. तर वांद्रे पूर्व येथील विद्यूत निरिक्षक कार्यालयाकडूनही परवानगी २७ मे २०२४ रोजी परवानगी घेण्यात आली होती. याशिवाय वांद्रे वाहतूक विभागाकडून २७ मे २०२४ रोजी ना-हरकत प्रमाणपत्र तर, रंगभूमी प्रयोग परिनिरिक्षक मंडळाकडूनही १० जून २०२४ रोजी परवानी घेण्यात आली होती. त्यानंतर मिश्रा यांनी पुरस्कार सोहळ्याचे इंटरनेटवर वेबसाईटच्या माध्यमातून प्रसिद्धी सुरू केली होती. मिश्रा यांनी अनेक व्यक्तींकडून तसेच मोठ्या कंपन्यांकडून प्रायोजकत्वाच्या नावाने मोठी रक्कम घेतली आहे, असा आरोप यासंदर्भात दाखल झालेल्या एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. पुरस्कार सोहळ्याच्या आयोजनात मिश्रा यांचा मुलगा अभिषेक याचाही सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास वांद्रे पोलीस करत आहे.
केंद्रीय मंत्र्याच्या नावाने फसवणूक : भाजपाच्या चित्रपट आघाडीचे अध्यक्ष समीर दीक्षित यांनी हा प्रकार लक्षात येताच तपास सुरू केला. त्यानंतर त्यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वांद्रे पोलिसांनी याप्रकरणी भारत न्याय संहितेच्या कलम ३१८ (४) व ३१९ (२) याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यावेळी समीर दीक्षित यांनी सांगितलं की, "मिश्रा यांनी कार्यक्रमाला केंद्रीय पर्यटन मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासह विविध नेत्यांच्या शुभेच्छा असल्याचं भासविलं. हा पुरस्कार केंद्र सरकारतर्फे राष्ट्रपती भवनात दिला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार असल्याचेही त्यांनी भासविलं. सरकारच्या पुस्काराचं नाव देखील मिश्रा यांनी कॉपी केल्याचा आरोप असून प्रत्यक्षात ट्रेडमार्क नोंदणी कार्यालयानं मिश्रा यांच्या कंपनीचा 'दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार' हा ट्रेडमार्क फेटाळला आहे. त्याच्या संकेतस्थळावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांची नावे शुभेच्छूक असल्याचं भासविण्यात आलं".