ठाणे : कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एकवर आज (21 फेब्रुवारी) सकाळी साडेअकरा वाजता दोन खोक्यांमध्ये भरलेली एकूण ५४ स्फोटके (डिटोनेटर्स) कल्याण लोहमार्ग पोलिसांनी जप्त केली आहेत. रेल्वे स्थानकात स्फोटके सापडल्यानं खळबळ उडाली आहे. पोलिसांनी रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे.
स्फोटकांची खोकी ताब्यात:कल्याण पश्चिम फलाट क्रमांक एकवर दोन खोके आहेत. त्यात स्फोटक सदृश्य ज्वलनशील पदार्थ असल्याची माहिती रेल्वे स्थानकातील एका सफाई कामगारानं कल्याण लोहमार्ग पोलिसांना दिली. यानंतर कल्याण लोहमार्ग विभागाचे उपायुक्त मनोज पाटील, कल्याण परिमंडळाचे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी तातडीने रेल्वे स्थानकात सहकाऱ्यांसह येऊन खोक्यांची तपासणी केली. पुढे ते दोन्ही खोके पोलिसांनी ताब्यात घेतले.
श्वान पथक घटनास्थळी दाखल:यानंतर तातडीने पोलिसांच्या श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. श्वानाच्या साहाय्यानं या खोक्यांची तपासणी करण्यात आली. ही स्फोटके रेल्वे स्थानकात कोणत्या कारणासाठी आणली होती? ती कोणी आणून ठेवली? स्फोटके रेल्वे स्थानकात आणून ठेवण्याचा उद्देश काय होता? अशा विविध अंगांनी पोलिसांच्या विशेष पथकानं तपास सुरू केला आहे.