अमरावती : गंगा, यमुना आणि पौराणिक कथेनुसार अदृश्य असणाऱ्या सरस्वती नदीच्या संगमावर उत्तरप्रदेशमधील प्रयागराज इथं महाकुंभ मेळ्यात कोट्यवधी भाविकांनी स्नान केलं. इतक्या मोठ्या संख्येनं लोकांची गर्दी तीन नद्यांच्या संगमावर उसळली असताना नदीचं पाणी खरंच शुद्ध असेल का? असा प्रश्न अनेकांनी उपस्थितं केला. हे पाणी कसं शुद्ध आहे, याबाबत काही संस्थांचे अहवाल पुढे आलेत. वास्तवात गंगेचं पाणी हे खरंच शुद्ध आणि पवित्र आहे. हे १३० वर्षांपूर्वीचं सिद्ध झालं आहे. गंगा नदी खरंच कशी शुद्ध आणि पवित्र याबाबत 'ईटीव्ही भारत'चा हा स्पेशल रिपोर्ट.
१३० वर्षांपूर्वी झालं संशोधन : "ब्रिटिशांची भारतात राजवट असताना भारतातील आपले अधिकारी आणि कर्मचारी सतत आजारी का पडतात? याबाबत नेमकं कारण शोधण्यासह त्यांच्यावर कसे उपचार करता येतील. यासाठी ब्रिटिश शासकांनी 'अर्नेस्ट हॅम्बरी हॅकिंग' या शास्त्रज्ञाची भारतात नेमणूक केली. त्याचं मुख्यालय आग्रा इथं होतं. १८९४ ला त्यावेळी आजचं प्रयागराज आणि तेव्हाच्या अलाहाबाद इथल्या तीन नद्यांच्या संगमावर कुंभमेळा भरला होता. त्या कुंभमेळ्यात अर्नेस्ट हॅम्बरी हॅकिंग आला. रोज लाखो लोक नदीत आंघोळ करतात. मल, मूत्र विसर्जन याच भागात करतात असं असूनही पाण्याला दुर्गंध नाही हे त्याच्या लक्षात आलं. तिकडं इंग्लंड आणि युरोपातील नद्या प्रदूषित होतात. इथं असं दिसत नाही, यामुळं त्यानं इथल्या पाण्याचं संशोधन केलं. संशोधनात त्याला गंगेच्या पाण्यात कुठलाही घातक विषाणू आढळला नाही. या पाण्याला दुर्गंध देखील नाही असं दिसून आलं." अशी माहिती सुक्ष्म जीवशास्त्राच्या शास्त्रज्ञ प्रा. डॉ. अर्चना मोहोड यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली.
संशोधनात 'ही' माहिती आली समोर : अर्नेस्ट हॅम्बरी हॅकिंग यानं गंगा नदीच्या पाण्यावर आणखी संशोधन केलं. यावेळी त्यानं कॉलरा आजाराचे विषाणू गंगेच्या पाण्यात टाकले. तेव्हा अवघ्या तीन तासात हे विषाणू नष्ट झाल्याचं त्याच्या लक्षात आलं. या प्रयोगामुळं गंगा नदीतील पाणी मानवाला घातक असलेल्या अति सुक्ष्म विषाणूंता नाश करतात. मात्र, त्याचा दुष्पपरिणाम मानवी शरीरावर होत नाही. असं निदान अर्नेस्ट हॅम्बरी हॅकिंग यांच्या संशोधनातून पुढं आलं.
मृत व्यक्तीच्या तोंडात 'या' कारणामुळं टाकतात गंगाजल : "भारतात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर त्याच्या तोंडात गंगाजल टाकलं जातं. माणसाचा मृत्यू झाल्यावर त्याचं शरीर काळं, निळं पडतं. मात्र, मृत व्यक्तीच्या तोंडात गंगाजल टाकलं तर ते मृत शरीर बारच वेळ ताजं राहतं. मृत शरीरातील विषाणूंचा प्रादुर्भाव कमी होतो. खरंतर मृत व्यक्ती हा पवित्र रहावा आणि त्याच्या भोवतालचा परिसर देखील चांगला राहावा हाच त्या मागचा खरा उद्देश आहे, हे स्पष्ट झालं." असं प्रा. डॉ.अर्चना मोहोड यांनी सांगितलं.