नाशिक Dengue Increased In Nashik : शहरात मागील चार महिन्यापासून डेंग्यूचा कहर सुरू आहे. शहरामध्ये हजारो डेंग्यू सदृश्य आजाराचे रुग्ण उपचार घेत आहेत. अशात एका युवक अभियंत्याचा डेंग्यूसदृश्य आजारांनं मृत्यू झाल्यानं आरोग्य विभाग खडबडून जागा झालाय. मागील आठवड्याभरात नाशिक शहरात 75 डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत.
नाशिक शहरात डेंग्यू आजाराचा कहर :नाशिक शहरात डेंग्यू आजारानं कहर केला आहे. मागील चार महिन्यापासून सातत्यानं डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्यानं महानगरपालिकेच्या आरोग्य विभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. मे महिन्यापासून डेंग्यूची रुग्णसंख्या वाढत आहे. कडक उष्णतेमुळे फ्रीज आणि एसीचा वापर वाढल्यानं त्यामागील साचलेल्या पाण्यामध्ये डेंगू डासांची उत्पत्ती होत असल्याचा दावा महानगरपालिकेने केला. अशात जोपर्यंत जोरदार पाऊस होणार नाही, तोपर्यंत डेंग्यू आजाराचं निर्मुलन होणार नाही, असं महानगरपालिकेने म्हटलं होतं. मात्र जोरदार पाऊस होऊन सुद्धा डेंग्यू आजाराचे रुग्ण सातत्यानं वाढत आहेत. मे महिन्यात ते 33 तर जून महिन्यात 161 तर जुलै महिन्यात तब्बल डेंग्यूचे 434 रुग्ण आढळून आले. यात ऑगस्ट महिन्यात 303 रूग्णांची भर पडली. तर आठ महिन्यात चिकनगुनिया आजाराचे चाळीस रुग्ण आढळून आलेत.
औषध फवारणी ठेकेदारांवर कारवाई करा : नाशिक "महानगरपालिकेचा वैद्यकीय विभाग काय करते, याची चौकशी झाली पाहिजे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी खासगी रुग्णालयात जाऊन डेंग्यू नियंत्रणासाठी प्रयत्न केले पाहिजेत. कागदावर औषध फवारणी केली जात असून अशा ठेकेदारांना काळ्या यादीत टाकले पाहिजे," असं भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी म्हटलं आहे.