नागपूरUday Samant :गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यात 5 हजार कोटी रुपये खर्चून स्टील प्लांटची निर्मिती होणार आहे. आज या स्टील प्लांटच्या कामाचं भूमिपूजन राज्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थिती झालं. यावेळी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत देखील उपस्थिती होते. यावेळी सामंत म्हणाले. "हा प्रकल्प गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीनं अत्यंत क्रांतिकारक प्रकल्प आहे. महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रासाठीसुद्धा महत्त्वाचा प्रकल्प आहे. दावोस करारावर टीका होत होती. त्याला एक प्रकारचं उत्तर या प्रकल्पाच्या माध्यमातून मिळालं" असं ते म्हणाले. "गडचिरोलीची नक्षलग्रस्त जिल्हा अशी ओळख आता पुसली जाणार आहे. आता गडचिरोलीला उद्योग नगरी म्हणून नवीन ओळख प्राप्त होणार आहे. गडचिरोलीचा विकास व्हावा, यासाठी धर्मरावबाबा आत्राम यांचं मोठं योगदान" असल्याचं उदय सामंत म्हणाले आहेत.
उद्धव ठाकरेंची स्वबळाची चाचपणी : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा स्वतंत्र पक्ष आहे. त्यांनी कुणाशी आघाडी करावी, युती करावी त्यांचा प्रश्न आहे. आगामी निवडणूक स्वबळावर लढावी, असं उद्धव ठाकरे यांच्या मनामध्ये असू शकतं. त्यामुळं कदाचित ते चाचपणी करत असतील, असं सामंत यांनी सांगितलं.
स्थानिकांना रोजगार मिळेल :स्थानिकांना कंपन्यांमध्ये प्राधान्यानं काम देण्यात यावं, असा शासन निर्णय आहे. गडचिरोलीमध्ये ही 75 टक्के पेक्षा जास्त स्थानिक लोकांनाचं काम मिळेल. या प्रकल्पात दहा हजार कोटी रुपये खर्च होत आहे. त्यात ७५ टक्के पेक्षा जास्त स्थानिक लोक असतील.
विशाळगडाच्या मुद्यावरून राजकारण नको :विशालगडाच्या बाबतीत जाती-पातीचं राजकारण करण्यात अर्थ नाही. अनाधिकृत बांधकामामुळंच झालेला उद्रेक होता. निवडणुका आल्या म्हणून जातीपातीचं, धर्माचं राजकारण करून महाराष्ट्र भडकवण्याचं काम कोणी करू नये, असं सामंतांनी विरोधकांना सुनावलं.