अमरावती :शहरालगत असणाऱ्या नांदगाव पेठ एमआयडीसी (Nandgaon Peth MIDC) येथील टेक्स्टाईल कंपनीत काम करणाऱ्या कामगारांना रविवारी विषयुक्त पाणी पिल्यांनं विषबाधा झाल्याची गंभीर घटना समोर आली. उलट्या आणि पोटदुखीनं त्रस्त शंभरहून अधिक महिलांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर इतर 43 गंभीर नागरिकांवर उपचार सुरू असल्याची माहिती मनसेचे जिल्हा संघटक पप्पू पाटील यांनी दिली.
काय आहे घटना :"गोल्डन फायबर टेक्सटाईल कंपनीत महिला आणि पुरुष असे 200 च्यावर कर्मचारी आहेत. रविवारी सकाळी नऊच्या सुमारास कर्मचाऱ्यांनी कंपनीतील पाणी पिलं असता, त्यांना मळमळ, पोटदुखी, डोकेदुखी असा त्रास व्हायला लागला. कर्मचाऱ्यांची प्रकृती खराब झाल्यानं कंपनी व्यवस्थापनानं डॉक्टरांना बोलवून कर्मचाऱ्यांवर उपचार करण्याचा प्रयत्न केला. औषध घेऊन देखील अनेक महिलांचा त्रास कमी झाला नसल्यानं त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं," असं पप्पू पाटील यांनी सांगितलं.
प्रतिक्रिया देताना पप्पू पाटील आणि बळवंत वानखडे (ETV Bharat Reporter)
प्रकरण दडपण्याचा आरोप : कंपनीत सकाळी नऊ वाजल्यापासून कर्मचाऱ्यांना त्रास होत असताना कंपनी प्रशासनानं स्वतःच कंपनीमध्ये डॉक्टर बोलावून कर्मचाऱ्यांवर उपचार केल्याचं कंपनीमधील व्यवस्थापकांकडून सांगण्यात आलं. मात्र "कंपनीतील कर्मचाऱ्यांची प्रकृती अतिशय गंभीर असताना त्यांच्यासाठी बाहेरून एखादा डॉक्टर बोलावणं हे चुकीचं असून त्यांना तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवणं गरजेचं होतं. एका कर्मचाऱ्यांनं माझ्याशी संपर्क साधल्यानं मी या कंपनीत धावून आलो," असं मनसेचे जिल्हा संघटक पप्पू पाटील यांनी सांगितलं.
80 महिलांना झाला त्रास : "कंपनीत पोहोचल्यावर कंपनी व्यवस्थापनाच्या वतीनं तीन चार जणांना त्रास होत आहे, असं सांगितलं गेलं. मात्र वास्तवात त्या कंपनीत 80 महिलांना त्रास होत असल्याचं लक्षात आलं. या सगळ्या महिलांना तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्याची व्यवस्था केली. हा संपूर्ण प्रकार कंपनी प्रशासनाला दडपायचा होता," असा आरोप देखील पप्पू पाटील यांनी केला आहे.
खासदार पोहोचले जिल्हा सामान्य : या गंभीर प्रकाराची माहिती मिळताच जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखडे हे जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचले. यावेळी खासदारांनी प्रकृती गंभीर असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांची भेट घेतली. तसेच डॉक्टरांना सर्व महिलांवर योग्य आणि तत्काळ उपचार करावेत असे निर्देश दिले. "विषयुक्त पाणी पिल्यानं गंभीर असणाऱ्या 43 महिलांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत," अशी माहिती खासदार बळवंत वानखडे यांनी दिली.
आरोग्य विभागाकडून चौकशी: नांदगाव पेठ एमआयडीसी परिसरातील गोल्डन फायबर कंपनीत विषयुक्त पाण्यानं कामगार आजारी झाल्याची माहिती मिळताच आरोग्य विभागाचं पथक कंपनीत धडकलं. आरोग्य विभागाच्या पथकाने कंपनीमधील दूषित पाणी तपासणी करिता घेतलं आहे. या गंभीर प्रकाराची चौकशी आरोग्य विभागाकडून केली जात आहे. एकाच नव्हे तर एमआयडीसी परिसरातील सर्वच कंपन्यांमधील परिस्थितीची चौकशी केली जाईल असं खासदार बळवंत वानखडे यांनी सांगितलं.
हेही वाचा -
- राजौरीमध्ये अन्नातून झाली विषबाधा; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, दोघांची प्रकृती चिंताजनक
- सोयाबीनच्या शेंगा खाल्ल्यानं 9 जणांना विषबाधा, 12 वर्षीय मुलीचा मृत्यू - Food Poisoning In Nanded
- पिण्याच्या पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, आरोग्य पथक तळ ठोकून; नांदेडमधील घटना - People Poisoned By Drinking Water