नाशिक Lok Sabha Election 2024 : 'गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा' या प्रसिद्ध चित्रपटात निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार हजारो रुपये चिल्लरच्या स्वरूपात अनामत रक्कम म्हणून देण्याचा प्रसंग दाखवण्यात आला आहे, हा जरी चित्रपटातील प्रसंग असला तरी त्याचं अनुकरण अनेक उमेदवारांनी केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळं शासनानं काढलेल्या नियमावलीत आता उमेदवारांनी केवळ एक हजार रुपयांची चिल्लर आणल्यास त्याची स्वीकृती केली जाईल, तसंच इतर रक्कम त्याला रोख स्वरूपात भरावी लागेल असं बंधन घालण्यात आलं आहे. त्यामुळं स्टंटबाजी करणाऱ्या उमेदवारांवर या निमित्तानं चाप बसणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून बदल : केंद्रीय निवडणूक आयोगानं अनामत रक्कम भरण्याच्या आदेशात बदल करून एक हजाराची तरतूद केली आहे. यापूर्वी पैसे देताना कुठल्याही स्वरूपाचे निर्बंध नसल्यानं स्टंटबाज उमेदवारांकडून अनामत रक्कम म्हणून हजारो रुपयांची चिल्लर आणली जात होती. यावरुन सर्वत्र प्रसिद्धी मिळावी हा यामागील हेतू असल्याचं आयोगाच्या निदर्शनास आलं. त्यामुळं निवडणूक आयोगानं आदेशात हा बदल केला आहे.
पैसे मोजताना कर्मचाऱ्यांची दमछाक : 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार मंगेश ढगे आणि शिवाजी वाघ यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतांना अनामत रक्कम म्हणून चिल्लर आणली होती. 25 हजार रक्कमेपैकी मंगेश ढगे यांनी 25 हजारांची चिल्लर, तर शिवाजी वाघ यांनी 10 हजार रुपयांची चिल्लर आणली होती, वाघ यांनी एक रुपया, दोन रुपये, पाच रुपये आणि दहा रुपयांची एकूण 4019 नाणी आणली होती. यामुळं हे उमेदवार चर्चेत आले असले तरी ही चिल्लर मोजतांना निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चांगलाच घाम फुटला होता. तर यंदाही अपक्ष उमेदवार मनोज गेडाम यांनी उमेदवारी अर्ज दाखल करतांना 12 हजार 500 रुपयांची चिल्लर निवडणूक विभागाकडं सुपूर्द केली होती. हे पैसे मोजताना कर्मचाऱ्यांची दमछाक झाल्याचं पाहायला मिळालं.
हेही वाचा -
- नारायण राणे आज भरणार उमेदवारी अर्ज; दिग्गजांच्या उपस्थितीत मारुती मंदिर येथून निघणार रॅली - Lok Sabha Election 2024
- "घोटाळे दाबण्याचा यशवंत विचार...", उदयनराजेंचा शरद पवारांवर हल्लाबोल - Lok Sabha Election 2024
- काय सांगता! ज्यांच्याविरुद्ध लढा, त्यांच्याकडूनच घेतलंय 55 लाखांचं कर्ज, सुप्रिया सुळेंच्या प्रतिज्ञापत्रातून मोठा खुलासा - Lok Sabha Election 2024