साताराIndia Alliance : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आक्षेप घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याच वर्षाच्या सुरुवातीला निवडणूक आयोगाची निवड प्रक्रिया बदलून सरन्यायाधीशांना काढून टाकत पंतप्रधान, एक मंत्री आणि विरोधी पक्षनेता एवढेच पद ठेवले. आमचं सरकार आल्यास आम्ही निवडणूक आयोगाच्या निवडीची प्रक्रिया बदलून त्यामध्ये सरन्यायाधीशांचा समावेश करू, असं त्यांनी सांगितलं.
निवडणूक आयोगाच्या निवडीची प्रक्रिया बदलणार :काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र दुष्काळ पाहणी समितीचे अध्यक्ष, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे काँग्रेसच्या आमदारांशी चर्चा केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, निवडणूक आयोगावरील एकटा विरोधी पक्षनेता काय करणार? नव्या व्यवस्थेत दोन निवडणूक आयुक्त नेमले. यामुळं आमचं सरकार आल्यावर सर्वप्रथम आम्ही निवडणूक आयोगाच्या निवडीची प्रक्रिया बदलू.
ऐन दुष्काळात सरकार निद्रिस्तावस्थेत :दुष्काळाच्या प्रश्नावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना सरकार निद्रितावस्थेत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दुष्काळाची माहिती देऊन आचारसंहिता शिथिल करण्याबाबत सरकारनं निवडणूक आयोगाला विनंती करावी, असं आवाहनही त्यांनी केलंय.