ठाणे BJP Symbol Blackened by Shivsainik : लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होऊन कुठल्याही क्षणी आचारसंहिता लागू शकते. याच पार्श्वभूमीवर भाजपा कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. डोंबिवली पश्चिमेतील कोपर भागात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी भिंतीवर पक्षाचे बोध चिन्हं कमळ काढले होते. मात्र, या चिन्हांवर कोपर भागातील दोन शिवसैनिकांनी काळं फासल्याची घटना शनिवारी (9 मार्च) सकाळी उघडकीस आली. त्यानंतर या प्रकरणी भाजपा डोंबिवली पश्चिम मंडळ अध्यक्ष समीर चिटणीस यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताच, आज (10 मार्च) दोघांना अटक करण्यात आली आहे. सम्राट अनंत मगरे, विशाल कोकाटे असे अटक केलेल्या शिवसैनिकांची नावे असून शिंदे गटाचे कट्टर कार्यकर्ते असल्याची माहिती समोर आली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण? : डोंबिवली पश्चिमेतील कोपर भागात भाजपा डोंबिवली पश्चिम मंडळ अध्यक्ष समीर चिटणीस, कोपर प्रभाग अध्यक्ष ऋषभ ठाकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा कार्यकर्त्यांनी गेल्या आठवडाभर 450 ठिकाणी 'पुन्हा एकदा मोदी सरकार' असं लिहित त्याच्या बाजूला कमळ चिन्ह रंगानं रेखाटून प्रचार मोहिमेला सुरुवात केली. मात्र, शनिवारी सकाळी सर्वच कमळ चिन्हांवर काळं फासलं गेल्याचं निदर्शणास आलं. त्यानंतर लगेच समीर चिटणीस यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी यासंबंधीत अधिक चौकशी केली असता शिंदे गटातील शिवसैनिक सम्राट मगरे आणि विशाल कोकाटे यांनी हा प्रकार केल्याचं समोर आलं. त्यानंतर आज या दोघांना विष्णुनगर पोलिसांनी अटक केली आहे.