नाशिक Eknath Shinde On Maha Vikas Aghadi :बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीनं उद्या महाराष्ट्र बंदची घोषणा दिली होती. मात्र विरोधकांनी या दुर्दैवी घटनेचं राजकारण केल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. न्यायालयानंही हा बंद बेकायदेशीर असून त्याला परवानगी नाकारल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.
विरोधकांवर कडाडून टीका : नाशिकच्या तपोवन येथे महायुतीकडून महिला सशक्तिकरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांच्यासह हजारोंच्या संख्येने नाशिक जिल्ह्यातील महिला उपस्थित होत्या. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महिलांसाठी सरकार राबवत असलेल्या योजनांबाबत माहिती दिली. तसंच ही योजना बंद पडेल, असं म्हणणाऱ्या विरोधकांचादेखील समाचार घेतला.
योजना बंद होणार नाही :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,"राज्यात आतापर्यंत 1 कोटी 40 बहिणींनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलाय. त्यापैकी एक कोटी 25 हजार बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झाले. इतर बहिणींच्या खात्यात लवकरच पैसे जमा होणार आहेत." बहिणीच्या खात्यात 1 हजार 500 हजार रुपये जमा झाल्यामुळं विरोधकांच्या पोटात दुखतंय. मात्र बहिणी सावत्र भावाला जोडा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत," असा टोला त्यांनी महाविकास आघाडीला लगावला. "हा जनतेचा पैसा आहे. ही योजना बंद होणार नाही. ही देना बँक आहे," असंही ते म्हणाले.
बंद करणं बेकायदेशीर : "आमचं सरकार संवेदनशील सरकार आहे. बदलापूर घटनेतील केस आम्ही फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार आहोत. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी आम्ही केली आहे. मात्र, विरोधक त्याचं राजकारण करत आहेत. त्यांच राजकारण म्हणजे टाळूवरचं लोणी खाण्यासारखं आहे. लाडकी बहीण योजनेप्रमाणे सुरक्षित बहीण असणारं राज्य विरोधकांना नकोय. त्यांनी या दुर्दैवी घटनेचं राजकारण थांबवावं. कोर्टानं बंद बेकायदेशीर असल्याचं म्हटलं आहे. बंदला न्यायालयानं परवानगी दिली नाही. कोरोना काळात ज्यांनी मृतांच्या टाळूवरचं लोणी खाल्लं, त्यांच्यापासून सावध राहा," असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला लगावला.