अमरावती Egg Hatching System In Melghat : कोंबडीनं अंडी दिल्यावर ती अंडी साधारण 21 ते 22 दिवसांपर्यंत उबवली जातात. या अंड्यांना उबवण्याचे विविध प्रकार असले तरी सातपुडा पर्वतरांगेत वसलेल्या मेळघाटच्या जंगलात आदिवासी बांधव कोंबडीची अंडी उबवण्यासाठी खास बाशांचं 'कुरड' तयार करतात. या अतिशय साध्या सोप्या मात्र खास 'कुरड'मध्ये बसून कोंबडी अंड्यांना ऊब देते. मेळघाटातील ही पद्धत अतिशय आगळीवेगळी असून नैसर्गिकदृष्ट्या अशा पद्धतीनं उबवल्या जाणाऱ्या अंड्यांमधून अतिशय दर्जेदार कोंबड्यांचं उत्पन्न होतं. पारंपरिक पद्धतीनं अंडी उबवण्यासाठी वापरली जाणारी ही पद्धत मेळघाटात सर्वत्रच अनेक काळापासून सुरू आहे.
अंडी उबवण्यासाठी मेळघाटात केला जातो पारंपरिक पद्धतीचा उपयोग (ETV Bharat Reporter) असं तयार केलं जातं बाशांचं 'कुरड' :मेळघाटात बांबू मोठ्या प्रमाणात आहेत. या बांबूची साल काढून त्याद्वारे विशिष्ट प्रकारची टोपली विणली जाते. या टोपलीला एक लांब बासा जोडला जातो. अशा प्रकारे तयार झालेल्या बाशांच्या या 'कुरड्या'मध्ये गवत ठेवलं जातं. यामध्ये कोंबडी साधारण आठ ते दहा अंडी घालते. भिंतीला लागून हे बाशांचं 'कुरड' उभं केलं जातं. यामध्ये अंडी अगदी सुरक्षित राहतात.
बाशांचं 'कुरड' अंड्यांसाठी सुरक्षित :संपूर्ण मेळघाट हे घनदाट जंगलानं वेढलेलं असून मेळघाटात पारंपरिक पद्धतीनं कुक्कुटपालन करणारे अंडी उबवण्यासाठी खास बाशांचं 'कुरड' तयार करतात. जमिनीपासून थोड्या उंच अंतरावर हे कुरड असल्यामुळं यामध्ये साप किंवा इतर प्राणी सहजासहजी जाऊ शकत नाही. त्यामुळं अंड्यांसाठी हे ठिकाण अतिशय सुरक्षित आहे. सलग 22 दिवस या टोपलीत कोंबडी बसून राहते, अशी माहिती धारणी तालुक्यात येणाऱ्या गोलाई या गावातील कुक्कुटपालक रामदास कातकडे यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली.
असे हवे तापमान आणि आर्द्रता :कोंबडीनं दिलेल्या अंड्यांमधून पिल्लू बाहेर येण्यासाठी 21 ते 22 दिवस वाट पाहावी लागते. अंडी उबवण्यासाठी कोंबडीला 37 .5 डिग्री सेंटीग्रेड तापमानाची गरज असणं आवश्यक आहे. तर आर्द्रता 80 टक्के हवी असावी. मेळघाटात बांबूची शंकूप्रमाणे टोपली तयार करून त्यामध्ये अगोदर गवत टाकून अंडी ठेवण्याची जागा अगदी मऊ बनवली जाते. यामध्ये ठेवलेल्या अंड्यांवर कोंबडी ऊब देण्यासाठी बसते. ही कोंबडी स्वतःहून चारापाणी खायला उठत नाही तर तिला सकाळी आणि सायंकाळी उठवावं लागतं, अशी माहिती श्री शिवाजी कृषी महाविद्यालयातील प्रा. डॉ. नंदकिशोर खंडारे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
22 दिवस कोंबड्यांचा 'कुरड्यां'मध्ये मुक्काम : कोंबडीनं अंडी दिल्यावर सलग 21 ते 22 दिवसांपर्यंत कोंबडीचा या 'कुरड'मध्ये अंड्यांना ऊब देण्यासाठी मुक्काम असतो. कोंबडी अंड्यांवर बसून राहिल्यामुळं कोंबडीच्या शरीरामध्ये विशिष्ट बदल होण्यास सुरुवात होते. कोंबडीच्या पोटावरील कातडी अंड्याच्या कवचाच्या संपर्कात आल्यामुळं एक प्रकारचा संकेत तिच्या मेंदूमधील ग्रंथीला जाऊन पोहोचतो. यामुळं कोंबडीमध्ये आई होण्याची क्षमता निर्माण होते. सलग 21 दिवसांच्या कालावधीमध्ये कोंबडी अंड्यावर बसून आपल्या शरीरातील उष्णता कातडीमार्फत अंड्याला पुरवते. या प्रक्रियेला कोंबडीद्वारे अंडी उबवणे म्हणतात.
हेही वाचा -
- मेळघाटातील दुर्गम गावात वसलेल्या चिमुकल्यांना मिळालं वर्षभराचं शैक्षणिक साहित्य; अकोल्याच्या सेवा संस्थेचा पुढाकार - Amravati News
- अमरावतीत आढळली दुर्मीळ पांढरी खारुताई : गाईच्या गोठ्यात मुक्काम इतर सवंगड्यांसोबत झाडांवर मारते उड्या - White Squirrel Spotted In Amravati
- छत नसलेलं 'आनंदेश्वर' मंदिर आहे आश्चर्याचा खजिना, श्रावण सोमवारी मंदिरात भाविकांची गर्दी - Anandeshwar Mahadev Temple