मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती तथा उद्योगपती राज कुंद्रा याला ईडीनं समन्स पाठवलं आहे. कथित पॉर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्राची चौकशी करण्यासाठी हे समन्स पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज कुंद्रा याच्या घरावर आणि कार्यालयात टाकलेल्या छाप्यानंतर ईडीनं राज कुंद्राला चौकशीसाठी समन्स बजावलं आहे. राज कुंद्रा सोबतच या प्रकरणातील इतर आरोपींना देखील ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आलं. या समन्सनुसार आज राज कुंद्रा आणि इतर आरोपींना ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहावं लागणार आहे.
शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला ईडीचं समन्स :कथित पोर्नोग्रफी प्रकरणात राज कुंद्रासह सर्व सहआरोपी जामीनावर बाहेर असून, आता पुन्हा एकदा या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. यात महत्त्वाची बाब म्हणजे या वर्षाच्या सुरुवातीला क्रिप्टोकरन्सी प्रकरणात ईडीनं राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांची 98 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. मात्र, मुंबई उच्च न्यायालयानं या प्रकरणात दिलासा दिला. आता पुन्हा राज कुंद्रा आणि सहआरोपींची आज चौकशी होणार असून या चौकशीत कोणती नवी माहिती समोर येते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.