मुंबई Amol Kirtikar : शिवसेना (ठाकरे गट) मुंबई वायव्यचे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल गजानन कीर्तिकर यांना अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) दोन दिवसांपूर्वी समन्स बजावलं होतं. त्यानंतर आज सकाळी अमोल कीर्तिकर यांच्या घरी ईडीचं पथक दाखल झालं असून त्यांची झाडाझडती सुरू आहे. शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि माजी खासदार अनिल देसाई यांचे निकटवर्तीय दिनेश भाऊ पाटील यांच्या विरोधात देखील ईडीनं फेब्रुवारी महिन्यात मनी लाँड्रीग प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता या आठवड्यात चौकशीसाठी त्यांना उपस्थित राहण्याचे समन्सदेखील बजावण्यात आलं आहे.
इकडे उमेदवारी अन तिकडे नोटीस : लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. त्यातच ठाकरे गटाच्या उमेदवारांची यादी आज जाहीर झाली. यात मुंबई वायव्य मतदारसंघातून अमोल गजानन कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर केलीय. त्यानंतर काही वेळातच ईडीनं नोटीस बजावलीय. त्यामुळं पुन्हा एकदा ईडीच्या टायमिंगवर चर्चा सुरू झालीय. अमोल कीर्तिकर यांना दिवसभरात हजर राहण्याचे निर्देश ईडीकडून देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. यापूर्वीही ठाकरे गटाचे नेते सुरज चव्हाण यांचीदेखील खिचडी घोटाळा प्रकरणी चौकशी करण्यात आली होती. चौकशीअंती त्यांना अटक करण्यात आली. सध्या सुरज चव्हाण हे न्यायालयीन कोठडीत आहेत. चव्हाण यांची जवळपास 60 ते 70 कोटींची मालमत्ता ईडीनं जप्त केली आहे. त्यामुळे अमोल कीर्तिकर यांच्या ईडी चौकशीमुळं त्यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं बोललं जातंय.