मुंबई COVID Scam Case : कथित बॉडीबॅग घोटाळा प्रकरणात मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची मंगळवारी (30 जानेवारी) ईडीकडून चौकशी करण्यात आली. पेडणेकर यांना ईडीकडून समन्स आलं होतं. तेव्हा त्या उपस्थित राहू शकल्या नव्हत्या. दरम्यान, त्यांनी पुढील तारीख मागितली होती. त्यानुसार मंगळवारची तारीख निश्चित करण्यात आली होती.
घोटाळ्याशी माझा काहीही संबंध नाही. चौकशीत जे खरं आहे, ते बाहेर येणार आहे. मी नियतीला मानते, हिशोब तर द्यावाच लागणार आहे. मी कधीही कुणावर दबाव टाकला नाही. देशात सध्या दबावाचं राजकारण सुरू आहे. मागितलेली कागदपत्रे आधीच ईडीला दिली आहेत. यंत्रणा कुणाच्या इशाऱ्यावर चालते, ते जग पाहत आहे - किशोरी पेडणेकर, ठाकरे गटाच्या नेत्या
संदीप राऊतांची झाली चौकशी : कोविड काळात झालेल्या कथित खिचडी घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांचे धाकटे बंधू संदीप राऊत यांना देखील ईडीनं समन्स बजावलं होतं. त्यानुसार त्यांनाही मंगळवारी चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. संदीप राऊत यांची ईडीनं तब्बल आठ तास चौकशी केलीय. त्यामुळं मंगळवारी ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर आणि संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊत यांची ईडीनं कसून चौकशी केलीय. मुंबई महानगरपालिकेच्या कोविड काळातील कथित खिचडी घोटाळा प्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे धाकटे भाऊ संदीप राऊत यांची मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं याआधी चौकशी केली होती.
या अगोदरही झाली होती चौकशी : कोविड काळात मुंबई महापालिकेत झालेल्या कथित बॉडीबॅग घोटाळ्याप्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना ईडीनं दिवाळीदरम्यान देखील नोटीस बजावून चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र, त्यावेळी देखील किशोरी पेडणेकर यांनी मुदतवाढ मागितली होती. त्यानंतर त्या चौकशीसाठी हजर झाल्या होत्या.