मुंबई : कुर्ल्यात बेस्ट बसच्या अपघातात सात जणांना जीव गमवावा लागला असून या अपघातात सुमारे पन्नास जण जखमी झाले आहेत. मात्र, एवढी मोठी दुर्घटना घडलीच कशी, हा प्रश्न अजून अनुत्तरित आहे. या प्रश्नाचं उत्तर आरोपी संजय मोरे यानं पोलिसांच्या चौकशीत दिलं आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "कुर्ला बस अपघात प्रकरणातील आरोपी संजय मोरे यानं बसच्या क्लचऐवजी अॅक्सिलेटरवर पाय ठेवला. संजयला इलेक्ट्रॉनिक ऑटोमॅटिक अवजड वाहनं चालवण्याचा अनुभव नव्हता, यापूर्वी संजय मिनी बस चालवायचा. या बसमध्ये क्लच, ब्रेक आणि अॅक्सलेटर होते. तसेच 10 दिवसांच्या प्रशिक्षणानंतर संजयला थेट मोठी बस चालवण्याची संधी देण्यात आली." त्यामुळेच हा अपघात झाल्याचं आता म्हटलं जात आहे.
ब्रेक ऐवजी अॅक्सिलेटर दाबला अन् गेला 7 जणांचा बळी ? :पोलिसांचं म्हणणं आहे की, "आरोपी संजय मोरे मागील तीन ते चार वर्षांपासून बेस्टमध्ये चालक म्हणून कार्यरत आहेत. मात्र, त्यांनी यापूर्वी ज्या वाहनांवर चालक म्हणून काम केलं आहे, ती वाहनं डिझेल वाहनं आहेत. या मिनी बस होत्या. या वाहनांमध्ये गियर, क्लच अशा गोष्टी असतात. मात्र, संजयनं आतापर्यंत इलेक्ट्रॉनिक अद्यावत स्वयंचलित वाहनं चालवलेली नाहीत. इलेक्ट्रॉनिक स्वयंचलित वाहनं चालवण्याचे दहा दिवसांपूर्वीच संजय याला प्रशिक्षण देण्यात आलं. या प्रशिक्षणानंतर संजय यांना मोठी बस चालवण्यासाठी देण्यात आली. मात्र, ऐन वाहनांच्या वरदळीच्या काळात संजय यानं ब्रेक ऐवजी अॅक्सिलेटर दाबला आणि यातूनच हा अपघात झाला," असं पोलीस सूत्रांनी सांगितलं.