अमरावती :LOK SABHA ELECTION 2024 : कोरोनानंतर राज्यात देगलूर, कसबा, कोल्हापूर, सोलापूर, पिंपरी या ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीबरोबर माझा एकच रिपब्लिकन पक्ष होता. या मतदारसंघात माझ्या आणि आदित्य ठाकरेंच्या सभा झाल्या, माझ्या आणि पटोलेंच्या सभा झाल्या. मात्र, आज केवळ 'मी एस सर आणि एस मॅडम' म्हणणारा नसल्यामुळे महाविकास आघाडीने मला तिकीट नाकारलं असल्याचं मत रिपब्लिकन पार्टी ऑफ गवई गटाचे प्रमुख डॉ. राजेंद्र गवई (Rajendra Gavai) यांनी व्यक्त केलं आहे.
सर्व समाजाने एकत्रित येण्याची गरज : वंचित बहुजन आघाडीने खरंतर मला पाठिंबा द्यायला हवा. या संदर्भात मी प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत संपर्क साधला आहे. महाविकास आघाडीच्या विरोधात सर्व समाजाने एकत्रित येण्याची गरज असल्याचं देखील राजेंद्र गवई म्हणाले. (Mahavikas Aghadi) मागासवर्गीयांसाठी जे झटत नाहीत अशा व्यक्तीला महाविकास आघाडीने उमेदवारी दिली आहे. या अशा उमेदवारांच्या पाठीशी कोणीही मागासवर्गीय मतदार नाही हे देखील आम्हाला महाविकास आघाडीला दाखवायचं असल्याचे राजेंद्र गवई
म्हणाले आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल करणार :अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या अमरावती लोकसभा मतदार संघात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा उमेदवार म्हणून, मी अर्ज दाखल करणार आहे. ही निवडणूक मागासवर्गीय समाजासाठी अतिशय महत्त्वाची निवडणूक असून या निवडणुकीत संविधानाचा विजय होईल असा विश्वास देखील डॉ. राजेंद्र गवई यांनी व्यक्त केला. दरम्यान, धर्मांध शक्तींना रोखण्याचा ठेका केवळ आपणच घेतलेला नसून महाविकास आघाडीने १५ दिवसांत आरपीआयला महाविकास आघाडीत सामावून घेतलं नाही तर अमरावतीसह पाच लोकसभा मतदारसंघात उमेदवार उभे करण्याचं सूतोवाच गवई यांनी केलं होतं.
काँग्रेसलाही दाखवणार हात :महाविकास आघाडीकडे आम्ही पाच ते सहा जागाांची मागणी केली. त्यांनी याबाबत सकारात्मक निर्णय न घेतल्यास आम्ही आमच्या प्रभाव क्षेत्रातील मतदारसंघात काँग्रेसलाही हात दाखवू असं डॅा. राजेंद्र गवई म्हणाले. त्यासंदर्भात पाच फेब्रुवारीला दुपारी एक वाजता अमरावती लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी दर्यापूर येथील नाईक हॉल येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.