महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'रानडे'चे माजी विभागप्रमुख ज्येष्ठ पत्रकार डॅा. किरण ठाकूर यांचं निधन - KIRAN THAKUR PASSES AWAY

पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन आणि वृत्तपत्र विद्या विभाग अर्थात 'रानडे'चे माजी विभागप्रमुख ज्येष्ठ पत्रकार डॅा. किरण ठाकूर यांचं निधन झालय. त्यांनी देहदान केलं आहे.

किरण ठाकूर
किरण ठाकूर (File image)

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 28, 2024, 4:09 PM IST

पुणे : पुणे श्रमिक पत्रकार संघ तसंच पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे संस्थापक विश्वस्त कार्यवाह आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्र विद्या विभागाचे (रानडे इन्स्टिट्यूट) निवृत्त विभागप्रमुख डॅा. किरण ठाकूर (वय ७७) यांचं आज सकाळी अल्पशा आजारानं निधन झालं. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे.


गेल्या आठवडाभरापासून डॉ. किरण ठाकूर आजारी होते. त्यांना थकवा जाणवत असल्यानं एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेथेच आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. डॅा. ठाकूर यांच्या इच्छेनुसार त्यांचं देहदान करण्यात आलं.

डॉ. किरण ठाकूर यांनी तीन दशकांहून अधिक काळ पत्रकारिता केली. अनेक ठिकाणी त्यांनी उपसंपादक तसंच विविध पदांवर काम केलं आहे. इंडियन पोस्ट आणि द ऑब्झर्वर ऑफ बिझनेस अँड पॉलिटिक्स या नियतकालिकांसाठीही त्यांनी काम केलं. डॉ. ठाकूर यांनी भारतातील वृत्तपत्रांच्या वेब आवृत्त्या या विषयावर पीएचडी संशोधन केलं. तसंच त्यांचे अनेक शोधनिबंधही प्रसिद्ध झाले. त्याचबरोबर न्यूजपेपर इंग्लिश, हँडबुक ऑन प्रिंट जर्नालिझम आदी पुस्तकांचं लेखनही त्यांनी केलं आहे.

डॉ. ठाकूर यांनी २००१ मध्ये अध्यापनाच्या क्षेत्रात प्रवेश केला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागात ते प्राध्यापक म्हणून रुजू झाले आणि २००१ ते २००७ या काळात विभागाच्या प्रगतीसाठी त्यांनी अनेक उपक्रम हाती घेतले आणि नव्या संशोधनांना चालना दिली. भारतीय विद्याभवनच्या नानासाहेब परुळेकर पत्रकारिता विभागाचं कामही त्यांनी काही काळ केलं आहे. त्यांच्या निधनानं पत्रकारिता क्षेत्राला मोठा धक्का मानला जात आहे.

ठाकूर सर विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून प्रसिद्ध होते. आपल्या विद्यर्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याची त्यांची अशी एक वेगळीच पद्धत होती. ते कधीच थेटपणे कोणत्याही प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे प्रश्न घेऊन जाणाऱ्याला देत नसत. तर त्याच्यातील उत्तर जाणून घेण्याची जिज्ञासा किती आहे याचा अंदाज घेत. विद्यार्थ्याला प्रशानाचं उत्तर आधी ते उपलब्ध माध्यांच्यामध्ये शोधण्यासाठी प्रोत्सिहित करत. शब्दकोष, संदर्भग्रंथ, इंटरनेट अशा सगळ्या गोष्टी करुन झाल्या का असं ते विचारीत. त्यानंतर ते प्रश्नाचं उत्तर देत. त्यांच्या उत्तरानं विद्यार्थ्याचं समाधान होत असे, त्याचबरोबर सरांच्या या पद्धतीमुळे त्यांच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रश्नाच्या संदर्भातील इतरही खूप माहिती मिळत असे. अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा जागृत करणारा शिक्षक हरपल्यानं त्यांच्या सगळ्याच विद्यार्थ्यांना धक्का बसला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details