नागपूर Nagpur Airport Threat Email : नागपूर विमानतळात स्फोट घडवू, अशा आशयाचा धमकीचा ई-मेल पुन्हा एकदा नागपूर विमानतळ प्रशासनाला प्राप्त झालाय. गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत नागपूर विमानतळावर स्फोट घडवण्यासंदर्भात धमकीचा ई-मेल आल्याची ही चौथी घटना आहे. वारंवार असे धमकीचे ई-मेल येत असल्यामुळं विमानतळ प्रशासन तसंच पोलिसांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आलीय.
तपासणी मोहीम सुरू : आज (25 जून) विमानतळ प्रशासनाला धमकीचा ई-मेल आल्यानंतर विमानतळ प्रशासनानं तात्काळ पोलिसांना या संदर्भातील माहिती दिली. सध्या पोलिसांकडून विमानतळ परिसरात कसून तपासणी मोहीम राबवली जात आहे. तर धमकीचे ई-मेल वारंवार कोण पाठवतंय? याचा शोध घेण्यासाठी नागपूर पोलिसांनी सायबर तज्ञांची टीमही कामाला लावली आहे.
दोन महिन्यातील चौथी घटना: विमानतळावर बॉम्ब असल्याच्या धमकीचा ई-मेल यापूर्वी 29 एप्रिल, 18 जून आणि 24 जून ला प्राप्त झाला होता. सोमवारी (24 जून) अधिकाऱ्यांना ई-मेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर नागपूर विमानतळाची सुरक्षा कर्मचाऱ्यांनी कसून झडती घेतली. परंतु परिसरात काहीही संशयास्पद आढळलं नाही, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. तसंच या संदर्भात विमानतळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं होतं की, "भारतीय विमानतळ प्राधिकरणाला (एएआय) एअरोड्रॉमच्या शौचालयात पाईप बॉम्ब ठेवल्याबद्दल ईमेल प्राप्त झाला. ई-मेलमधील मजकूर सकाळी नागपूर विमानतळ अधिकाऱ्यांना कळवण्यात आला. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी विमानतळ परिसराची कसून तपासणी केली. परंतु, त्यांना कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही", असं ते म्हणाले. तर असाच प्रकार मंगळवारी पुन्हा एकदा घडला. सातत्यानं घडत असलेल्या या प्रकारावर नियंत्रण मिळविण्यासाठी मेल पाठविणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन अटक व्हायला हवी, अशी भावना व्यक्त करण्यात येत आहे.
नागपुरातून देशातील प्रमुख शहरात तसंच परदेशात जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. या वर्दळीच्या आणि महत्वाच्या विमानतळाला बॉम्बनं उडवण्याची धमकी वारंवार मिळत असल्यानं सुरक्षा यंत्रणा याची सखोल चौकशी करीत आहे. या विमानतळावरुन दररोज सरासरी सात ते आठ हजार लोक विमान प्रवास करतात. सध्या नागपुरातून दिल्ली, मुंबई, पुणे, इंदौर, हैदराबाद, बंगळुरू, कोलकाता, अहमदाबाद, चेन्नई, लखनौ, नाशिक, बेळगाव, अजमेरसाठी विमानं असून याशिवाय शारजहा आणि दोहा ही आंतरराष्ट्रीय विमानसेवाही आहे.
हेही वाचा -
- पॅरिसहून मुंबईला येत असलेल्या विस्तारा विमानात बॉम्बची धमकी; मुंबई विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग - Bomb Threat In Vistara Flight
- नवी दिल्लीवरून वाराणसीला जाणाऱ्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची अधिकाऱ्यांची माहिती