मुंबई :मुंबईतील उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघात रविवारी रात्री महाविकास आघाडीकडून प्रचार करण्यात येत होता. मात्र मुंबईतील घाटकोपरमध्ये एका गुजराती सोसायटीत मराठी प्रचाराचे पत्रक वाटण्यास मज्जाव करण्यात आला. या घटनेनंतर महाराष्ट्रातच मराठी भाषेचा प्रचार करण्यास नकार दिल्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत असून, या घटनेचा निषेध केला जात आहे. दरम्यान, यावर विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया येत असताना आता सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रेणुका शहाणे हिने देखील या घटनेबद्दल संताप व्यक्त केला आहे. मराठीला विरोध करणाऱ्यांना मत देवू नका, त्यांना धडा शिकवा अशी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
आपलं बहुमूल्य मत देऊ नका...
"मराठी "not welcome" म्हणणार्या लोकांना कृपया मत देऊ नका. मराठी लोकांना घरं न देणाऱ्या लोकांचे समर्थन करणाऱ्या उमेदवारांना कृपया आपलं बहुमूल्य मत देऊ नका. ज्यांच्या कामाच्या ठिकाणी मराठी भाषा किंवा लोकांना कमी लेखलं जातं, अशा लोकांचे समर्थन करणाऱ्या उमेदवारांना किंवा पक्षाला कृपया मत देऊ नका. कुठल्याही जाती, धर्म किंवा भाषेच्या विरुद्ध मी नाही, पण जे आपल्याच महाराष्ट्रात, आपल्या भाषेचा आणि संस्कृतीचा मान ठेवत नाहीत, अशा लोकांना, शांतपणे, मत न देऊन, त्यांची चूक दाखवून दिलीच पाहिजे," असं सोशल मीडियावरील केलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्री रेणुका शहाणे हिने म्हटलं आहे.
काय आहे घाटकोपरमधील प्रकार?
ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून महविकास आघाडीचे ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील आणि महायुतीचे मिहीर कोटचा हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. रविवारी रात्री महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांचे प्रचार पॅम्प्लेट वाटण्यासाठी इमारतीत जाऊ पाहणाऱ्या मराठी शिवसैनिक महिला व पुरुष कार्यकर्त्यांना तेथील गुजरात्यांनी मज्जाव केला. घाटकोपर पश्चिम येथील माणिकलाल भागात असलेल्या समर्पण नामक गुजराती बहुल सोसायटीत रविवारी रात्री ८.३० च्या सुमारास प्रचारासाठी गेलेल्या शिवसैनिकांना मज्जाव करण्यात आला. कारण विचारले असता, आपण भाजपचे पदाधिकारी असून त्यांनाच मतदान करणार असल्याने तुम्हाला आत जाता येणार नाही असे सांगत दटावले. उपस्थित महिला व पुरुष शिवसैनिकांनी आपण केवळ पॅम्प्लेट द्यायला जात असून तुम्ही कोणालाही मतदान करा तो तुमचा अधिकार असल्याची विनवणी केली. परंतु तरीही त्यांना आत सोडण्यात आले नाही. बऱ्याच वादावादीनंतर पोलिसांच्या मध्यस्थीमुळे केवळ दोन जणांनाच आत जाण्याची परवानगी देण्यात आली.