महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नितेश राणेंच्या बेताल वक्तव्याला मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा आहे का? विरोधकांचा सवाल - NITESH RANE TARGET MUSLIMS

ज्या मुस्लिम कुटुंबात 2 पेक्षा जास्त मुलं आहेत, त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाऊ नये, अशी मागणी भाजपा आमदार नितेश राणेंनी केलीय.

Nitesh Rane
नितेश राणे (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 11, 2024, 3:00 PM IST

मुंबई - इंडिया आघाडीतील काँग्रेसच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करत तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांना समाजवादी पक्षाने पाठिंबा जाहीर केलाय. तर दुसरीकडे राज्यात महाविकास आघाडीत योग्य तो मानसन्मान मिळत नसल्याचे कारण देत समाजवादी पक्ष महाविकास आघाडीतून बाहेर पडलाय. अशा परिस्थितीमध्ये भाजपा नेत्यांकडूनही समाजवादी पक्षाला टार्गेट केलं जातंय. ज्या मुस्लिम कुटुंबात 2 पेक्षा जास्त मुलं आहेत, त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाऊ नये, अशी मागणी भाजपा आमदार नितेश राणेंनी केलीय. तर आतापर्यंत स्वतःच्या फायद्यासाठी मुस्लिम मतांचं नेहमी राजकारण झालंय. परंतु वारंवार मुस्लिम समाजाला टार्गेट केलं जात असल्याने आता आमचा समाजही या राजकारणाला कंटाळला असल्याचं मत समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार रईस शेख यांनी ई टीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केलंय.

काय म्हणालेत नितेश राणे? :ज्या मुस्लिम कुटुंबात दोनपेक्षा जास्त मुले असतील, अशा कुटुंबांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, असे विधान भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी केलंय. नितेश राणे इथवरच थांबले नाहीत, तर प्रत्येक शासकीय योजनेचा लाभ मुस्लिम कुटुंब मोठ्या प्रमाणात घेतात. परंतु मतदान करताना यांना हिंदुत्व नको असतं, मोदी नको असतात, मग तुम्ही शासकीय योजनांचा लाभ का घेता? असा सवालही नितेश राणे यांनी केलाय. नितेश राणे यांच्या या वक्तव्यानंतर समाजवादी पक्षाकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आलीय.

मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यासाठी :नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख म्हणालेत की, नितेश राणे यांचं वक्तव्य अतिशय चुकीचं आहे. यापूर्वीही त्यांनी अनेकदा अशा पद्धतीची भडकावू भाषणं करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. याबाबत अनेकदा तक्रारही केली असून, त्याचा काही उपयोग झालेला नाही. नितेश राणे यांनी अशा पद्धतीचे वक्तव्य करण्याअगोदर भाजपाची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या वक्तव्याचा अभ्यास करावा. काही दिवसांपूर्वी मोहन भागवत यांनी जनतेला उद्देशून तीन अपत्य जन्माला घालावी, असं म्हटलं होतं. मग त्यांच्या बोलण्याचा नेमका अर्थ काय होता? त्या सुविधा सर्वांसाठी बंद केल्या जाणार का? वास्तविक नितेश राणे, गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांना मंत्रिमंडळाचे डोहाळे लागले आहेत. मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यासाठी अशा पद्धतीची खालच्या स्तरावरची वक्तव्यं या नेत्यांकडून वारंवार केली जाताहेत. परंतु या नेत्यांवर कुठल्याही पद्धतीची कारवाई केली जात नाही, हे अत्यंत वाईट असल्याचं रईस शेख म्हणालेत.

मुख्यमंत्र्यांचा नितेश राणेंना पाठिंबा आहे का? : राजकीय विश्लेषक विजय चोरमारे म्हणालेत की, नितेश राणे यांच्याकडून अशा पद्धतीची वक्तव्य वारंवार केली जाताहेत. यापूर्वीही केवळ हिंदूंसोबतच व्यवहार करा, मुस्लिमांसोबत व्यवहार करू नका. तसेच सर्वधर्मसमभाव मानू नका, असंही नितेश राणे म्हणाले होते. यावर अजित पवार यांनीसुद्धा नितेश राणे यांना उद्देशून एखाद्या समाज घटकाविरोधातील वक्तव्य कदापि खपवून घेतली जाणार नाहीत, असं ठणकावून सांगितलं होतं. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमकपणे लढत असताना दुसरीकडे मुस्लिम समाजाला टार्गेट करण्याचं काम हे नितेश राणे यांच्याकडून केले जातेय. लाडकी बहीण योजनेचा लाभ हा कुणाला द्यावा, कुणाला नाही, याबाबत पूर्ण स्पष्टता असताना मुस्लिम समाजाला या योजनेपासून दूर लोटता येणार नाही. तो अधिकार नितेश राणे यांचा नाही. तरीही अशा पद्धतीची भडकावू वक्तव्य वारंवार करूनसुद्धा नितेश राणे यांच्यावर कुठलीही कारवाई केली जात नाही. याचाच अर्थ माजी गृहमंत्री आणि आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा नितेश राणे यांच्या वक्तव्याला पाठिंबा आहे का? असाही प्रश्न उपस्थित होतो. सर्वधर्मसमभाव या मार्गाने जात असताना अशा प्रकारे एखाद्या समाजाला टार्गेट करून मतांचं राजकारण करणं योग्य नसल्याचंही विजय चोरमारे यांनी सांगितलंय.

ABOUT THE AUTHOR

...view details