छत्रपती संभाजीनगर : दिवाळी काही तासावर येऊन ठेपली आहे. दिवाळी सणात आकर्षण असतं ते आकाश कंदीलाचे. वेगवेगळ्या प्रकारचे आकर्षक आकाश कंदील बाजारात दाखल झाले आहेत. मात्र, यंदाचं आकर्षण ठरलं ते मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांचा फोटो असलेला आकाश कंदील. आरक्षण लढ्याचा संघर्षाचे प्रतीक म्हणून या कंदिलांची खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे. इतकंच नाही तर बाजारपेठेत आलेला सर्व माल संपला असून कंदीलाला मोठी मागणी असल्याची माहिती, महिला व्यावसायिकांनी दिली.
जरांगे पाटलांच्या आकाश कंदीलाला मागणी: दिवाळी आली की, बाजारपेठेत रंगबिरंगी आकाश कंदील विक्रीसाठी येतात. आकर्षक आणि मनमोहक असे आकाश कंदील सर्वांच लक्ष वेधून घेतात. मात्र, यंदा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला तो मनोज जरांगे पाटील यांचा फोटो असलेला आकाश कंदील. एका बाजूला त्यांचा फोटो त्याखाली 'संघर्ष योद्धा' असं लिहिलं आहे. तर दुसऱ्या बाजूला 'एक मराठा लाख मराठा' अशी घोषणा त्यामध्ये नमूद केली आहे. जवळपास तीन ते चार वेगवेगळ्या प्रकारचे हे कंदील बाजारपेठेत दाखल आहेत. दिवाळी सुरू होण्यापूर्वीच यांची विक्री मोठ्या प्रमाणात झालीय. त्यांचे दर 600 ते 900 रुपये असल्याची माहिती, राखी राठोड यांनी दिली.
प्रतिक्रिया देताना व्यावसायिक राखी राठोड (ETV Bharat Reporter)
मनोज जरांगे यांचे आकर्षण वाढले :मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मागील एक वर्षापासून मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र लढा उभा केलाय. त्यांची आंदोलनाची पद्धत, सरकारवर टीका करण्याची शैली यामुळं मराठा समाजात त्यांची एक वेगळीच ओळख निर्माण झालीय. गेल्या काही महिन्यांमध्ये त्यांच्या विक्रमी सभा झाल्या. त्यामुळंच समाज त्यांना एका दैवत सारखा मान देत आहे. समाजाला आरक्षण फक्त जरांगे पाटीलच देऊ शकतात असा विश्वास अनेकांमध्ये त्यांनी निर्माण केलाय. त्यामुळंच आंदोलनाचे एक प्रतीक म्हणून त्यांच्या फोटो असलेला आकाश कंदील लावला जात आहे.
देवांच्या आणि महापुरुषांच्या आकाश कंदिलांची मागणी : बाजारपेठेत वेगवेगळ्या प्रकारचे आकाश कंदील विक्रीसाठी दाखल झाले आहेत. यंदा देवी देवतांचे आणि महापुरुषांचे फोटो असलेले आकाश कंदीलाला अधिक मागणी आहे. भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोंचा देखील यात समावेश आहे.
हेही वाचा -
- यंदा कधी आहे दिवाळी; वसुबारसपासून ते भाऊबीजपर्यंत जाणून घ्या योग्य तिथी, शुभ मुहूर्त, तारीख
- ठाण्यातील पर्यावरणभिमुख कंदील लागणार अमिताभ बच्चन, सलमान खानच्या दाराबाहेर
- मुंबईतून 176 देशांमध्ये निघाला दिवाळी फराळ; कोट्यवधींची होते उलाढाल, उद्योजकाने सांगितली 'ईटीव्ही न्यूज'ची खास आठवण