नांदेड : नांदेड येथे शीख बांधवांचा 'हल्लाबोल' कार्यक्रम काल (2 नोव्हेंबर) झाला. शीख धर्माचे सहावे गुरु हरगोविंद सिंगजी महाराज यांच्या स्मरणार्थ 'बंदी छोड दिन' साजरा केला जातो. याच बंदी छोड दिनानिमित्त नांदेड येथे हल्लाबोल कार्यक्रम झाला. गुरुद्वारामध्ये धार्मिक कार्यक्रम पार पडल्यानंतर हल्लाबोल चौकातून या कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमासाठी देश-विदेशातून लाखो शिख बांधव सहभागी झाले होते. प्रत्येक दिवाळीला हा हल्लाबोल कार्यक्रम साजरा करण्यात येतो.
तोफांची सलामी :दरवर्षीप्रमाणे यंदाही नांदेड येथील तख्त सचखंड श्री हजूर अबिचलनगर साहिब येथे बंदी छोड दिन मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावानं साजरा करण्यात आला. गुरुद्वार सचखंड बोर्डाचे प्रशासक विजय सतबीर सिंघ माजी आय. ए. एस. म्हणाले की, "बंदी छोड दिनानिमित्त तख्त साहिब येथे जगभरातील भाविकांनी दीपप्रज्वलन करून गुरुजींबद्दल भक्ती आणि प्रेम व्यक्त केलं. प्राचीन परंपरेनुसार दीपमाला महल्ल्याला तोफांची सलामी देण्यात आली. जत्थेदार सिंघ साहिब संत बाबा कुलवंत सिंघ जी आणि पंज प्यारे साहिबांच्या मार्गदर्शनाखाली प्राचीन परंपरेनुसार तख्त साहिब येथे दुपारी 4 वाजता अरदास केल्यानंतर दीपमाला महल्ला पूर्ण वैभवात बाहेर काढण्यात आला. यावेळी वाद्य पथकं, कीर्तन मंडळी आणि देशभरातील भाविक सहभागी झाले होते.