चंद्रपूर : महाराष्ट्र-तेलंगणा राज्यांच्या सीमाभागात पकडण्यात आलेल्या वाघावरून आता दोन्ही राज्यांच्या वनविभागामध्ये वाद निर्माण झालाय. पकडण्यात आलेला वाघ हा तेलंगणा राज्यातील असून, तो नरभक्षक नसल्याचे सांगण्यात येतंय. यासंदर्भात आता महाराष्ट्र राज्याच्या वनविभागाकडून माहिती देण्यात आलीय. या वाघाचा संचार हा कायम मानवी वस्तीकडे असल्याचे आढळून आल्याने पुढील धोका टाळण्यासाठी सुरक्षेचं पाऊल म्हणून वाघाला पकडण्यात आलंय, असंही चंद्रपूर वनविभागाचं म्हणणं आहे.
काय आहे प्रकरण :चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या कमालीची वाढलीय. आपला अधिवास निर्माण करण्यासाठी वाघांनी स्थलांतर करायला सुरुवात केलीय. त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष आता शिगेला पोहोचलाय. चंद्रपूर जिल्ह्याला लागूनच तेलंगणा राज्याची सीमा आहे. तिथेदेखील वाघांच्या अधिवासासाठी पर्याप्त जंगल असल्याने या दोन्ही राज्यांच्या सीमेवर वाघांचा मुक्तसंचार आहे. वाघ स्थलांतर करताना बऱ्याचदा ते मानवी वस्तीजवळून जात असल्यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष पाहायला मिळतो.
वाघाला पकडण्यासाठी 50 ट्रॅप कॅमेरे : राजुरा वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या विरूर भागात एस 13 या वाघिणीचा मुक्तसंचार होता. याच दरम्यान कविठपेठ येथील वच्छला आत्राम या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालाय, तर 18 डिसेंबरला बगुलवाई येथील शेतकरी जग्गू आत्राम शेतकऱ्यालादेखील वाघाने ठार केलंय. यानंतर मध्य चांदा वनविभागाने या वाघाला पकडण्यासाठी 50 ट्रॅप कॅमेरे लावलेत. वाघाची ओळख पटवण्यासाठी घटनास्थळाहून घेण्यात आलेले नमुने हैदराबाद येथील संशोधन प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेत. याच दरम्यान एक वाघ मानव वस्तीजवळ मुक्तसंचार करताना आढळून आला. त्यानुसार मंगळवारी (31 डिसेंबर) वाघाला पकडण्याच्या आदेशानुसार वाघाला डार्ट (गुंगीचे औषध) मारून पकडण्यात आले. मात्र यानंतर आता वाद निर्माण झालाय. तेलंगणा राज्यातील वनविभागानुसार हा वाघ आसिफाबाद जिल्ह्यातील कुमराम भीम या जंगलात होता. या वाघाला मंगळवारी चंद्रपूर वनविभागाने पकडले.
काय म्हणाले चंद्रपूर वनविभाग : याबाबत चंद्रपूर वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर म्हणाले की, "अर्ध्या चंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या वाढलेल्या संख्येमुळे मानव-वन्यजीव संघर्षाचा प्रश्न निर्माण झालाय. यात काहींचा बळी जातोय. त्यानुसार दक्षता म्हणून राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून विरुर येथील अंतरगाव येथे वाघाला सुरक्षितरीत्या पकडण्यात आलंय. पकडलेल्या वाघाला चंद्रपूर येथील वन्यजीव उपचार केंद्रात दाखल करण्यात आलंय. खरं तर हा वाघ मानव वस्तीच्या अत्यंत जवळ आल्याने हा निर्णय घेण्यात आलाय. दोन जणांचा जीव घेणारा हा तोच वाघ आहे, असा कुठलाही दावा यात करण्यात आलेला नाही. मात्र जिथे मानवी मृत्यूच्या घटना घडल्या, त्या परिसरातदेखील या वाघाचा वावर होता हे स्पष्ट झालंय.