धुळे : साक्री तालुक्यातील राईनपाडा येथील पाच निरपराध नाथजोगी गोसावी समाजातील भिक्षुकांच्या हत्याकांडानं संपूर्ण देशात मॉब लिचिंगचा विषय चर्चेत आला होता. या प्रकरणी सात आरोपींना धुळे जिल्हा सत्र न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली. विशेष म्हणजे या 7 आरोपींना वेगवेगळ्या कलमान्वये 1 ते 10 वर्षापर्यंतच्या कालावधीची वेगवेगळी शिक्षादेखील सुनावली आहे. या सर्व शिक्षा आरोपींना एकत्र भोगायच्या आहेत.
पाच भिक्षुकांच्या हत्या प्रकरणात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कामकाज पाहिले. तत्कालीन पोलीस उप अधीक्षक श्रीकांत घुमरे यांनी तपास अधिकारी म्हणून काम पाहिले. जन्मठेपेची शिक्षा सुनावल्या गेलेल्या सातपैकी एक गुन्हेगार तात्पुरत्या जामिनावर बाहेर होता. तो निकालाच्या दिवशी कोर्टात न आल्यानं त्याच्या विरोधात न्यायालयानं पकड वॉरंट काढले आहे. निरपराध भिक्षुकांच्या हत्येप्रकरणी राज्य सरकारनं यापूर्वीच पीडितांच्या जवळच्या नातलगांना पाच लाखांची मदत केली. निकाल देताना न्यायाधिशांनी पीडितांच्या नातेवाईकांना मदतीबाबतचेदेखील आदेश दिले आहेत.
खोट्या बातम्यांमुळे झालंं हत्याकांड-सोशल मीडियावर सहा वर्षांपूर्वी 1 जुलै 2018 च्या पूर्वी मुलं पळविणार्या टोळीबाबत सोशल मीडियावर खोट्या बातम्या प्रसारीत झाल्या होत्या. या खोट्या बातम्यांमुळेच जनता भयभीत झाली होती. अशातच दादाराव शंकरराव भोसले (वय 47), भारत शंकर भोसले (वय 45), राजू रामा उर्फ श्रीमंत भोसले (वय 45), भारत शंकर माळवे (वय 45) सर्व राहणार खवे ता. मंगळवेढा जि.सोलापूर आणि अगणू श्रीमंत हिंगोले (वय 22) रा. मानेवाडी ता. मंगळवेढा हे नाथजोगी गोसावी समाजातील भिक्षुक आपला उदरनिर्वाह करण्यासाठी आणि भिक्षुकी मागण्यासाठी राईनपाडा गावात पोहोचले.
35 आरोपींविरुध्द होता गुन्हा दाखल-सोशल मिडियावरील खोट्या बातम्यांमुळे हे भिक्षुक म्हणजेच मुलं पळविणारी टोळी असल्याची ग्रामस्थांची समजूत झाली. तर काहींनी त्यांना ग्रामपंचायत कार्यालयात कोंडून लाठ्या काठ्या आणि लोखंडी रॉडने मारहाण करुन ठार मारले. विशेष म्हणजे या घटनेचे मोबाईल चित्रीकरण देखील आरोपींपैकी काहींनी केले होते. राज्याला हादरवुन सोडणार्या या मॉब लिंचींगच्या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले हेाते. याप्रकरणी पिंपळनेर पोलिसात एएसआय रविंद्र काशिनाथ रणधिर यांच्या तक्रारीविरोधोात 35 आरोपींविरुध्द गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी 28 आरोपी पकडले होते. या 28 पैकी 7 जणांनी लाठ्या आणि लोखंडी गजानं भिक्षुकांना मारहाण करुन ठार मारले होते.
या आरोपींना जन्मठेप-राईनपाडा हत्त्याकांडाच्या घटनेची दखल राज्य शासनानंविशेष सरकारी वकील म्हणून अॅड. उज्वल निकम यांची नियुक्ती केली होती. तब्बल सहा वर्षानंतर राईनपाडा केसचा निकाल जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधिश डॉ. एफ. ए. एम ख्वाजा यांच्या कोर्टात लागला. न्यायाधिशांनी महादू ओंकार खैरनार, महादू ओंकार पवार, दशरथ पिंपळसे, हिरालाल गवळी, मोतीलाल साबळे, काळू गावीतसह सात आरोपींना भिक्षुकांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवत त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
काय म्हणाले उज्जवल निकम?निकालानंतर माध्यमांशी बोालताना अॅड.उज्वल निकम म्हणाले की, भिक्षुकांना प्लॅन करुन मारले नसले तरी जमावाने हिंसक होवून ठार मारणं हे निंदनीय आहे. हा माझा युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य धरला. न्यायालयानं आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. राईनपाडा प्रकरणाचा तपास करणारे तपास अधिकारी डीवायएसपी घुमरे, एपीआय श्रीकांत पाटील, पीएसआय अमृतकर यांचे देखील सहकार्य लाभले. त्याबद्दल या खटल्यामध्ये मला अॅड. देवेंद्रसिंह तंवर आणि गणेश पाटील यांची मोलाची मदत लाभली.
हेही वाचा-
- लव्ह ट्रॅन्गल की आणखी काही? गुवाहाटीतील हॉटेलमध्ये महाराष्ट्रातील व्यक्तीचा मृतदेह आढळल्यानं खळबळ
- अजहरी अटक प्रकरणातील दगडफेकीत चार पोलीस जखमी, पाच जणांना अटक