मनमाड Lok Sabha Election 2024:२० वर्षापासून भाजपाचा गड असलेल्या दिंडोरी मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) उमेदवार भास्कर भगरे यांचा पराभव व्हावा याकरिता अनेक खेळ्या खेळण्यात आल्या. पराभवाच्या भीतीनं चक्क भास्कर भगरे यांच्या नावाशी साधर्म्य असलेला बाबू भगरे नावाचा उमेदवार उभा करण्यात आला. ईव्हीएम मशीनमध्ये एका नावाचे दोन उमेदवार असल्यामुळं ग्रामीण भागातील अनेक मतदारांनी दुसऱ्या भगरे यांना मतदान केलं. याचा परिणाम भगरे यांच्या लीडवर झाला असून देखील त्यांनी भाजपा उमेदवार डॉ. भारती पवार यांना तब्बल एक लाखापेक्षा जास्त मतांनी धोबीपछाड देत भास्कर भगरे जायंट किलर ठरले आहेत.
धनशक्तिविरुद्ध जनशक्ती :दिंडोरी लोकसभा मतदार संघात यंदा परिवर्तन झालं असून भाजपाच्या ताब्यात असलेला हा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि महाविकास आघाडीचे भास्कर भगरे यांनी खेचून आणला. धनशक्तिविरुद्ध जनशक्ती अशा चुरशीच्या लढतीत भास्कर भगरे यांनी विजय आपल्या नावे केला. उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच त्यांच्या विजयाची आणि परिवर्तनाची चर्चा सुरू होती आणि ती सत्यात उतरली आहे. लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी डॉ. भारती पवार यांच्याबद्दल प्रचंड नाराजी होती. विरोधकांपेक्षा स्वपक्षीय भाजपातून त्यांना मोठा विरोध होता. शहरात भाजपामध्ये राजकारण बघायला मिळत होतं. भाजपाचे प्रमुख नेते डॉ. भारती पवार यांच्या उमेदवारीमुळं नाराज होते.
महायुतीच्या वतीने वंचित बहुजन आघाडीला मतदान करण्याचं आवाहन : महाविकास आघाडीचे भास्कर भगरे यांचा सुरुवातीपासूनच जोर होता. नांदगाव तालुक्यात शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे हे आहेत. लोकसभा निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी ही कांदे यांच्यावर होती. मात्र, जसजशी निवडणूक जवळ आली तसतसा पराभव दिसायला लागल्यानं मतांची विभागणी व्हावी, या उदेशानं महाविकास आघाडीतर्फे दलित मुस्लिम मतदारसंघात संभ्रम पसरविण्यात आला. तुम्ही भाजपाला मत नाही देत ना? मग किमान वंचित बहुजन आघाडीला तरी मतदान करा असं आवाहन करताना शिंदे गटाचे अनेक नेते मनमाड शहर आणि तालुक्यात बघायला मिळाले.