पुणे :सह्याद्री पर्वत रांगातील उंच शिखरावर चारही बाजूंनी पसरलेल्या घनदाट अभयारण्यात बारा ज्योतिर्लिंगापैकी सहावं ज्योतिर्लिंग असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर इथं शिवभक्तांची मांदियाळी पाहायला मिळाली. महाशिवरात्रीनिमित्त भिमाशंकर इथं मोठी यात्रा भरते. भाविकांना सुलभ दर्शन व्हावं यासाठी प्रशासन मोठ्या प्रमाणात सज्ज झालं. मंदिर परिसरात असलेला मंडप, आकर्षित करण्याऱ्या फुलांची सजावट भाविकांचं लक्ष वेधून घेत आहे. आजच्या दिवसापासून पुढील 48 तास मंदिराचा गाभारा भाविकांसाठी खुला करण्याचं मंदिर समितीनं जाहीर केलं. त्यामुळे भाविकांना दर्शन घेणं सोयीचं ठरणार आहे.
पहाटेची महाआरती, दुग्धाभिषेक संपन्न :यावेळी मंत्री दिलीप वळसे पाटील आणि नवनिर्वाचित आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते पहाटेची महाआरती आणि दुग्धाभिषेक करण्यात आला. दरम्यान दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, "महाशिवरात्रीनिमित्त पहाटेची पूजा पार पडली असून यानिमित्तानं एकच संकल्प केला आहे. भीमाशंकर मंदिराच्या परिसरातील रखडलेलं काम हे लवकरात लवकर आमच्या हातून आणि सरकारच्या माध्यमातून पूर्ण व्हावं. भाविकांसाठी पाण्याच्या प्रश्नावर आम्ही काम करतोय. स्थानिक पातळीवर तीन वेगवेगळ्या विभागातून सदर मंदिराबाबत निर्णय घेतला जातो. फॉरेस्ट, अभयारण्य, पर्यावरण संवेदनशील क्षेत्र कायदा लागू होतो. त्यामुळे तीनही निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत परवानगी घेण्याच्या वेळी अनेक अडथळे निर्माण होतात. म्हणून सगळ्या योजना आखलेल्या असताना सुद्धा, त्या पूर्ण करायला वेळ लागतो. त्यामुळे थोडी फार विकास कामं रखडली गेली आहेत. मागच्या वेळी चांगला पाऊस पडून सुद्धा सर्वत्र पाण्याचे साठे कमी होतायेत. त्याचा परिणाम कदाचित दुष्काळी परिस्थितीत होऊ शकतो. तरी याविषयी आम्ही प्रामुख्यानं लक्ष ठेऊन आहोत. ज्या ज्या गावाला पिण्याचं पाणी कमी पडेल, तिथं पिण्याचं पाणी पोहोचवण्याचं काम आम्ही करू. स्थानिक ठिकाणी थंड वातावरण जरी असलं, तरी उन्हाचा तडाखा सर्वत्र आहे. त्याचा भाविकांना त्रास होणार आहे," असं मत दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केलं आहे.