मुंबईDevendra Fadnavis :उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार पियुष गोयल यांच्या कांदिवली येथील निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते आज (10 एप्रिल) करण्यात आलं. याप्रसंगी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना बिनशर्थ पाठिंबा दिला त्याची आठवण करून दिली. सोबतच मुंबईत धावणारं एकमेव इंजिन राज ठाकरे यांचं असून त्या इंजिननेसुद्धा मोदी यांना पाठिंबा दिल्याचं म्हटलं आहे. तसंच उत्तर मुंबई मतदार संघामध्ये सर्वांत जास्त रेकॉर्ड ब्रेक मतांनी पियुष गोयल यांचा विजय होणार असा आत्मविश्वास व्यक्त केला.
पहिल्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन :उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार पियुष गोयल यांच्या निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन आज (10 एप्रिल) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते करण्यात आलं. याप्रसंगी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पियुष गोयल हे मोदींच्या टीममधील मंत्री आहेत. मुंबईमध्ये निवडणूक सुरू झाल्यानंतर पहिल्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन हे उत्तर मुंबईमध्ये होत आहे. उत्तर मुंबई हा आपला गड आहे. रामभाऊ, गोपाल शेट्टी यांनी येथे उत्तम प्रकारे काम केलं आहे. आज आमच्यासाठी आनंदाची आणि गर्वाची गोष्ट आहे की, मोदी टीम मधील अत्यंत महत्त्वाचे खेळाडू ज्यांनी मोदी यांच्या मंत्रिमंडळामध्ये एक परफॉर्मर मंत्री म्हणून आपलं नाव कमावलं. तसंच प्रत्येक क्षेत्रात पियुष गोयल यांनी आपला ठसा उमटवला आहे.
उद्धव ठाकरेंनी जागा काँग्रेसच्या माथी मारली :देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघ जागेसाठी काँग्रेस आणि उबाठामध्ये पहिले तुम, पहिले तुम असं चाललं होतं. ही जागा कोणीच घ्यायला तयार नव्हतं. दोघेही एकमेकांना जागा द्यायला तयार झाले होते. शेवटी उबाठाने ही जागा काँग्रेसच्या माथी मारली आहे. आता त्यांना उमेदवार सापडत नाही आहे. उमेदवार मिळेल का नाही, अशी परिस्थिती काँग्रेसची झाली आहे. इथे महाविकास आघाडी एकही काम दाखवू शकत नाही. आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारनं मुंबईचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम सुरू झालं. यामागे मोदी यांचं व्हिजन आहे. मुंबईतील झोपडपट्टीवासीयांचं जीवन बदलण्याचं काम मोदी यांनी केलं आहे. आम्हाला मुंबई झोपडपट्टी मुक्त करायची आहे. काँग्रेसने गरिबी हटवणारा नारा दिला; परंतु त्यांनी गरीब हटवला गरीबी नाही, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला लगावला आहे.