पुणे Devendra Fadnavis On Govinddev Giri Maharaj:स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांनी भारतीय संस्कृतीचा प्रसार करण्याच्या महायज्ञात समिधा अर्पण करण्याचं कार्य सातत्यानं केलं आहे. स्वामीजींकडून देशाची आणि भारतीय विचारांची सेवा यापुढेही घडावी, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांना अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या. आळंदी येथे आयोजित गीताभक्ती अमृत महोत्सवात ते बोलत होते.
८१ देशात भगवद्गीता पेाहोचविण्याचे कार्य : संत ज्ञानेश्वर महाराजांपासून ते तुकाराम महाराजांपर्यंत सर्व संतांनी भागवत धर्माची पताका फडकत ठेवला आहे. ज्या भूमीतून हे कार्य झालं त्या ज्ञानेश्वर माऊलींच्या भूमीत अनेक संत एकत्रित आले आहेत. भारतातील सर्व संतांनी आपले जीवन भारतीय संस्कृती आणि मूल्यांच्या प्रसारासाठी दिलं. स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांनी ८१ देशात लाखो लोकांपर्यंत भगवद्गीता पेाहोचविण्याचं कार्य केलं. ज्या संत ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेला सामान्यांपर्यंत त्यांच्या भाषेत पोहोचविलं, त्या माऊलींच्या भूमीत गीता प्रसाराचं कार्य करणाऱ्या विद्वानाचा सत्कार होणं हा चांगला योग आहे. स्वामी गोविंददेवगिरी यांनी राष्ट्राची आणि सृष्टीची चिंता केल्यानं त्यांच्या अभिष्टचिंतनासाठी मोठा जनसमुदाय उपस्थित आहे, असं फडणवीस म्हणाले.
गोविंददेवगिरी महाराजांच्या हातून देशसेवा घडावी : स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांनी आपल्या मधुर वाणीने आध्यात्मिक विचारांच्या प्रसाराचे कार्य केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन काम करणाऱ्या स्वामी गोविंददेवगिरी महाराजांच्या हातून यापुढेही देशसेवा घडावी, अशा शुभेच्छा सहकार मंत्री वळसे-पाटील यांनी दिल्या.
देश विदेशात केलं प्रबोधनाचं काम : स्वामी गोविंददेवगिरी यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त त्यांना शुभेच्छा देऊन मंत्री वळसे-पाटील म्हणाले की, गीता परिवार, महर्षी वेद व्यसास प्रतिष्ठान, श्रीकृष्ण सेवा निधी आणि संत ज्ञानेश्वर गुरूकुलाच्या माध्यमातून स्वामीजींनी गेली अनेक वर्षे भारतीय संस्कृती, आध्यात्मिक परंपरा, वेदवाङ्मय बाबत देश विदेशात प्रबोधनाचं कार्य केलं आहे. व्रतस्थ वृत्तीनं त्यांचं कार्य आजही सुरू आहे. आध्यात्मिक मूल्यांचं पालन, संवर्धन करतांना त्यांनी आध्यात्म विचार सर्वदूर पोहोचविला. यावेळी इतरही मान्यवरांनीही विचार व्यक्त केले. सदरील कार्यक्रमाला सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, अयोध्या येथील कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती महाराज, अवधेशानंद महाराज, ह.भ.प.मारोतीबाबा कुरेकर, राम मंदिराचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज, रामदेव महाराज, रमेशभाई ओझा, आमदार उमा खापरे, माजी मंत्री बाळा भेगडे, गिरीधर काळे आदी उपस्थित होते.
हेही वाचा -
- लोकसभा निवडणुकीकरिता आध्यात्मिक नगरी नाशिकमधून तीन धर्मगुरू इच्छुक, कोणत्या पक्षांकडून मिळणार उमेदवारी?
- महाराष्ट्रीयन गोविंदगिरी महाराजांच्या हस्ते पंतप्रधान मोदींनी सोडला उपवास; वाचा कोण आहेत गोविंदगिरी महाराज?
- अयोध्या, काशी, मथुरा ही तीन मंदिरं महत्वाची; बाकी सगळं विसरुन जाऊ - गोविंद देव गिरी महाराज