अमरावती Comrades Marathon : धावण्याच्या स्पर्धेतील कठीण व खडतर म्हणजे काॅम्रेड मॅरेथॉन स्पर्धा मानली जाते. जगभरातील धावपटूंचं लक्ष या स्पर्धेकडं लागलेलं असतं. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी संपूर्ण जगातून इथं धावपटू येतात. एकदा तरी आपण या स्पर्धेत भाग घ्यावा असं प्रत्येक धावपटूचं स्वप्न असतं. असंच स्वप्न यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील देव चौधरी या 26 वर्षाच्या तरुणानं पाहिलं अन् साकारही केलं. या सोबतच गेल्या 97 वर्षात कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये पहिल्यांदाच रौप्य पदक मिळवून देणारा तो पहिला भारतीय ठरला.
देव चौधरी, धावपटू (ETV Bharat Reporter) 7 तास 4 मिनीटांत पूर्ण केलं 90 किमी अंतर : जगातील सर्वांत प्रतिष्ठेची आणि खडतर समजली जाणारी दक्षिण आफ्रिकामधील डर्बन इथं कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात येते. ही स्पर्धा यंदा 9 जुनला पार पडली. ही स्पर्धा पुर्ण करताना धावपटूचा चांगलाच कस लागतो. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद या ठिकाणी राहणाऱ्या देव चौधरीनं 7 तास 4 मिनीटांत ही स्पर्धा पूर्ण केली. कोणत्याही प्रकारचं महागडं प्रशिक्षण न घेता तसंच अत्याधुनिक साधनसामग्रीची उपलब्धता नसताना सुद्धा देवनं हे यश मिळवलं. त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
97 वर्षात पहिल्यांदाच भारताला मिळालं रौप्य पदक :साऊथ आफ्रिकेत दर वर्षी ऐतिहासिक 90 किमी अंतराची मॅरेथॉन संपन्न होत असते. या मॅरेथॉनचं वैशिष्ट्य म्हणजे या मॅरेथॉनचा ट्रॅक हा 1800 मीटर उंच चढणीचा आणि अवघड समजला जातो. त्यामुळं कसलेल्या मॅरेथॉन पटूंचा देखील कॉम्रेड मॅरेथॉन पूर्ण करताना शारीरिक आणि मानसिक कस लागतो. त्याचप्रमाणे या मॅरेथॉन मधील टप्पे हे निर्धारित वेळेच्या आतमध्ये पूर्ण करावे लागतात. एकूण 12 तास ही मॅरेथॉन पूर्ण करण्यासाठी कालावधी निर्धारित असताना देव चौधरीनं ही मॅरेथॉन एकूण 7 तास 4 मिनिटांमध्ये पूर्ण करुन सर्वाधिक वेगवान भारतीय धावक बनला आहे. गेल्या 97 वर्षात जे कोणाला जमलं नाही ते देवनं करुन दाखवलं. कमी वेळात प्रतिष्ठेची कॉम्रेड मॅरेथॉन पूर्ण केली. त्याच्या या यशासाठी त्याला रौप्य पदकानं सन्मानित करण्यात आलं.
हेही वाचा :
- अमरावतीच्या धावपटूंचा दक्षिण आफ्रिकेत विक्रम ; सलग ११ तासात धावत जिंकली 'कॉम्रेड मॅरेथॉन'
- मुंबई मॅरेथॉनमध्ये अक्षय, टायगरची बाईकवर एन्ट्री; अटल सेतू मॅरेथॉन स्पर्धेला दाखवला हिरवा झेंडा
- अटल सेतूवर पहिल्या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन, वाहनांना पर्यायी मार्गावरून जाण्याच्या सूचना