ठाणे MLA Ganpat Gaikwad Firing Incident : कल्याण पूर्वचे भाजपा आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शिंदे गटाचे कल्याण पूर्वचे शहरप्रमुख माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यात शुक्रवारी रात्री वाद झाला. त्यानंतर उल्हासनगरमधील पोलीस ठाण्यातच वरिष्ठ पोलीस निरीक्षकासमोर भाजपा आमदारानं गोळीबार केला. जमिनीच्या वादातून हा गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना उल्हासनगरमधील हिल लाईन पोलीस ठाण्यात घडली आहे. दरम्यान, या घटनेवर आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ही गोळीबार झालेली घटना गंभीर असून, या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
उच्चस्तरीय चौकशीचे आदेश : आमदार गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड हे दोघेही तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आले होते. त्यांच्यामध्ये काही गोष्टीवरून मतभेद झाले. या तक्रारीवेळी त्यांच्यात बाचाबाची झाली आणि गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड आणि त्यांच्या समर्थकांवर गोळीबार केला. यामध्ये दोन जण जखमी झाले. आता या प्रकरणाची गंभीर दखल राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे त्यांनी आदेश दिले आहेत.
वादाचं रुपांतर नंतर हाणामारीत : भाजपा आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांची हिल लाइन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या दालनात शुक्रवारी चर्चा सुरू होती. यावेळी गणपत गायकवाड समर्थक आणि महेश गायकवाड समर्थक यांच्यात काही कारणावरून वाद झाला. त्यावेळी काही कळायच्या आत या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. हा वाद सुरू झाला तेव्हाच भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात महेश गायकवाड गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर आता ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
राजकीय वादातून गोळीबार? : गेल्या वर्षभरापासून कल्याण पूर्व विधानसभेच्या उमेदवारीवरून दोन्ही गायकवाडांमध्ये वाद सुरूच होता. जेव्हा केव्हा काही कारणांमुळं वाद होत होता, तेव्हा दोघंही एकमेकांवर निशाणा साधण्याची एकही संधी सोडत नव्हते. गोळीबाराची ही घटना दोघांमधील पूर्ववैमनस्यातून घडली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेनं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.