मुंबई Devendra Fadnavis : "देशात काँग्रेस नसती, तर देश अधिक पुढे गेला असता, तसंच कलम 370 सारख्या चुका झाल्या नसत्या," असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर केलाय. 'काँग्रेस न होती तो क्या होता' या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर ते जाहीर मुलाखतीत बोलत होते. "शरद पवारांनी कन्या सुप्रिया सुळे यांना कार्य आध्यक्ष बनवल्यानं राष्ट्रवादीत फूट पडली. त्यामुळं अजित पवार बाहेर पडले. राज्यातील राजकारण सुरुवातीला 30 कुटुंबांभोवती फिरत होतं," अशी टीकाही फडणवीस यांनी केली.
मी पुन्हा आलो : "'मी पुन्हा येईन' हे फक्त वाक्य नव्हतं. मी कशासाठी येणार हेही सांगितलं होतं. पण, लोकांनी ते एकच वाक्य प्रसिद्ध केलं. मी पुन्हा येईन म्हणालो. त्यानुसार मी अडीच वर्षांनी पुन्हा आलो. मात्र, त्याचवेळी दोन पक्ष फोडून, दोन साथीदार आणले आहेत," असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
काँग्रेसकडून 370 सारख्या चुका : 'काँग्रेस न होती तो क्या होता' या पुस्तकाचं मुंबईतील वरळी येथील एका हॉटेलमध्ये प्रकाशन झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी प्रियम गांधी मोदी यांनी प्रकट चर्चा केली. या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नसती, तर या विषयावर मोकळेपणानं उत्तरे दिली. तसंच अन्य प्रश्नांनाही त्यांनी आपल्या शैलीत उत्तरं दिली. काँग्रेस नसती तर काय झालं असतं? या प्रश्नाचं उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मी उत्तर द्यायचं म्हटलं तर 5-6 खंड होतील. पण, काँग्रेस नसती, तर देशाचं विभाजन झालं नसतं, दहशतवाद झाला नसता, दुराचार झाला नसता, देश कदाचित आताच विकसित झालेला असता, सांस्कृतिक दृष्ट्या देश पुढे असला असता, 370 सारख्या चुका झाल्याचं नसत्या."
दोन पक्ष फोडून पुन्हा आलो : "'मी पुन्हा येईन' हे वाक्य नव्हतं. त्यात मी कोणासाठी पुन्हा येईन, काय काम करेन? हे सगळं होतं. पण, हे एक वाक्य खूप प्रसिद्ध झालं. लोकांनी आम्हाला निवडून दिलं पण, उद्धव ठाकरेंनी स्वार्थासाठी पाठीत खंजीर खुपसला.आम्ही पुन्हा आलो, तेव्हा कौतुक झालं. आम्हाला पुन्हा यायला अडीच वर्षे लागली. पण, जेव्हा आलो तेव्हा दोन पक्ष फोडून आलो," अशी मिश्किल प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.
विरोधकांवर टीका : "लोकसभा निवडणुकीत 400 पेक्षा अधिक उमेदवारांना निवडूण आणण्याच्या मोदींच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. त्यांनी असं म्हटलं आहे की, आम्ही शिवरायांना मानणारे लोक आहोत. शिवरायांनी स्वतःला छत्रपती म्हणवलं. राज्याभिषेक झाला, तेव्हापासून एकदाही गादी उपभोगली नाही. त्यांनी राज्याभिषेक फक्त यासाठी केला की, जगाला कळावं की, आम्ही गुलामीतून बाहेर आलोय. मोदीसुद्धा हेच म्हणाले की, आम्ही तिसऱ्यांदा निवडून येऊ. पण, सत्तेसाठी नाही तर, लोकांसाठी हा विश्वास आहे, अहंकार नाही," भाजपा विरोधकांना शिल्लक ठेवत नाही या आरोपाबद्दल बोलताना ते म्हणाले की, "काही राजकीय विश्लेषक म्हणाले होते की इंडिया आघाडीमध्ये सगळी इंजिन आहेत. एकही भोंगा नाही. त्यामुळं टिकणार नाही, तसंच सुरू आहे. सगळी इंजिन्स आपल्यापल्या दिशेला जात आहेत. राजकारणात विरोधक असलेच पाहिजेत पण, आम्ही विरोधक असताना आणि आताच्या विरोधकांमध्ये फरक आहे. हे असे लोक आहेत जे ऑर्डर बिघडवू इच्छित आहे. ही कसली व्यवस्था आहे की, जेव्हा सुप्रीम कोर्ट त्यांच्या बाजूनं निर्णय देईल, तेव्हा योग्य आणि विरोधात दिला की, शिव्या देतात."
2014 नंतर राजकारणाचं चित्र बदललं : महाराष्ट्राचं राजकारण हे गलिच्छ मानलं जातं असा प्रश्न विचारल्यावर फडणवीस म्हणाले, "सत्तेतून पैसा, पैशातून ताकद त्यातून सत्ता असं राजकारण सुरू होतं. सुरुवातीच्या काळातील राज्यातील राजकारण पाहिल्यास ठराविक कुटुंबांभोवती राजकारण फिरत राहिलं. त्यातील काही कुटुंबांनी समाजकार्यसुद्धा केलं. 2014 नंतर पंतप्रधानांनी देशासह महाराष्ट्रातील राजकारणाचं चित्र बदललं. ही व्यवस्था तोडण्याच काम मोदींनी केलं. आपण हे करू शकलो कारण, मोदी यांचं नेतृत्व आमच्या मागं होतं. गुंडांच्या व्यतिरिक्त राजकारण होऊ शकतं, हे आम्ही मागच्या 10 वर्षात दाखवलं आहे. यात 100 टक्के यश मिळालं असं नाही पण, काम सुरु आहे. आणखी पुढे जायचं आहे. स्वच्छता अभियान सुरूच राहील."
परिवार वाद हेच काँग्रेसचं राजकारण : परिवार वादाबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, "काँग्रसनं राजकीय नियम तयार केले. तेच नियम प्रमाण मानले जात होते. परिवार वाद, पैशाच्या जोरावर राजकरण करण्यालाच काँग्रेसनं प्रमाण मानलं होतं. त्यावेळी भाजपा एकमेव पक्ष होता, ज्यांनी स्वतः ची ऑर्डर तयार केली. आता अनेक पक्ष आमची ऑर्डर (नियम) स्वीकारत आहेत. परिवार वाद म्हणजे राजकारण्यांचे नातेवाईक राजकारणात यावे. पण, आपल्या सामर्थ्यावर यावेत. सामर्थ्य असलेल्या व्यक्तीला डावलून नातेवाईकाला संधी देणं म्हणजे परिवार वाद. आज बघा, खर्गे अध्यक्ष असले, तरी ते निर्णय घेऊ शकत नाहीत. निर्णय गांधीच घेतात."
राष्ट्रवादी, शिवसेना का फुटली? : "गृहमंत्री म्हणाले, राष्ट्रवादी का फुटली? कारण पक्ष पुतण्याला नाही, तर मुलीला द्या. शिवसेनेत आदित्यला आणण्यासाठी जेव्हा वैचारिकता सोडली गेली, तेव्हा पक्ष फुटला. ही लढाई मोठी आहे. यात फक्त, पक्ष नाही तर यांना निवडून देणारेसुद्धा दोषी आहेत, असं म्हणावं लागेल. मला विश्वास आहे की, भविष्यात राजकारण्यांची मुलं राजकरणात दिसतील तर स्वतःच्या सामर्थ्यावर दिसतील," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हे वाचलंत का :
- काँग्रेस नसती तर तुमचं काय झालं असतं? चर्चा करायला कधीही तयार... सुप्रिया सुळेंचा भाजपाला टोला
- Bharat Jodo Nyay Yatra: 90 टक्के लोकसंख्या अन्यायामुळे त्रस्त-राहुल गांधी
- Ambadas Danve Vs Chandrakant Khaire: उमेदवारीवरुन वाद विकोपाला, ठाकरेंनी दानवे-खैरेंना तातडीनं मातोश्रीवर बोलावलं!