नाशिक : लोकसभा निवडणुकीत राज्यासह नाशिक जिल्ह्यात महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक मतदारसंघांमध्ये अटीतटीचा सामना होईल अशी परिस्थिती होती. मात्र अनेक मतदारसंघात धक्कादायक निकाल समोर आलेत. यात बागलाण मतदारसंघातील माजी आमदार दीपिका चव्हाण यांना 10.2 टक्के मते, चांदवडचे माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल 9.8 टक्के मते, इगतपुरीचे माजी आमदार काशिनाथ मेंगाळ 9.2 टक्के मते तर माजी आमदार निर्मला गावित यांना 11.2 टक्के मते मिळाली तर इतर उमेदवार असे एकूण 108 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. यातील माजी आमदार सत्तेपासून दूर राहिल्यानं जनतेचं काम करण्यास आलेल्या अडचणी, तरुण मतदारांना जोडण्यात आलेलं अपयश, सक्रिय जनसंपर्क कमी, तसंच मागील पाच वर्षे सत्तेपासून दूर झाल्यानं दुबळे झालेले संघटन अशी प्रमुख कारणे राजकीय विश्लेषकांनी सांगितली.
माजी आमदार गावित यांची दोनदा अनामत जप्त -इगतपुरी मतदारसंघातील माजी आमदार निर्मला गावित यांनी काँग्रेसकडून दोनवेळा, शिवसेनेकडून एकवेळा आणि अपक्ष एकदा अशा चारवेळा निवडणूक लढवल्या आहेत. त्यात दोनवेळा त्या विजयी झाल्या तर दोनवेळा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यंदा त्यांनी अपक्ष उमेदवारी केली, त्यात त्यांचा मोठा पराभव झाला. केवळ 23 हजार 767 मते मिळाल्यानं त्यांची अनामत रक्कम जप्त झाली.
माजी आमदार कोतवालांचा सहावा पराभव - चांदवडचे माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांनी यंदा आठवी विधानसभा निवडणूक लढवली, आतापर्यंत आठपैकी दोनवेळा त्यांना विजय मिळाला तर सहावेळा त्यांना पराभवला सामोरे जावे लागले. यात 2024 चा पराभव मोठा ठरला त्यांना चौथ्या क्रमांकाची 23 हजार 335 मते मिळाली. यात त्यांची अनामत रक्कम जप्त झाली.