कोल्हापूरBendur Festival Kolhapur :काळ्या मातीतून सोनं पिकावं यासाठी आपल्या मालकाबरोबर इमाने-इतबारे राबणाऱ्या पशुधनाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण म्हणजे बेंदूर. आज जिल्ह्यात शेतकरी बांधवांनी बैलाबरोबरच म्हैस आणि गायींना सजवून त्यांची सवाद्य मिरवणूक काढली. कोल्हापुरातील पंचगंगा नदी घाटावर सालाबाद प्रमाणे यंदाही पारंपारिक वाद्यांच्या गजरात शहरातील गवळी गल्ली, उत्तरेश्वर पेठ येथील बैल मालकांनी आपल्या लाडक्या जिवा-शिवाच्या बैलजोडीला आंघोळ घातली. यानंतर टोकदार शिंगांणा रंगरंगोटी करून अंगावर आकर्षक शालेमुळं देखण्या बैलाचं रुबाबदार रूप आणखी खुलुन दिसत होतं. ढोल ताशा आणि कडाडणाऱ्या हलगी-घुमक्याच्या तालावर नदीघाट परिसरात बैल पळवण्याच्या शर्यती पाहण्यासाठी कोल्हापूरकरांनी गर्दी केली होती.
कोल्हापुरात पारंपरिक पद्धतीनं बेंदूर साजरा :राज्यातील काही भागांमध्ये विशेषता आंध्रप्रदेश, कर्नाटक या राज्यात वटसावित्रीची पौर्णिमा झाल्यानंतर बेंदूर सण साजरा केला जातो. मृग नक्षत्रावर येणाऱ्या पावसाच्या आधी शेतकरी शिवारातील पेरण्या संपवून आता काहीसा निवांत झाला आहे. आपल्या धन्याबरोबर अविरत कष्ट घेणाऱ्या बैलाप्रति कृतज्ञता म्हणून राज्यातील विशेषत: पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये कर्नाटकी बेंदूर हा सण साजरा केला जातो. या दिवशी शेतकऱ्यांचा सखा अशी ओळख असलेल्या बैलाला विश्रांती दिली जाते. शेतकरी हा सण बैल आणि सोबतच्या पशुधनाबरोबर साजरा करतो. या दिवशी पुरणपोळ्यांचा नैवेद्य बैलांना खाऊ घातला जातो. कोल्हापुरातही पारंपरिक पद्धतीनं जिल्ह्यात कर्नाटकी बेंदूर सण उत्साहात साजरा झाला. ग्रामीण भागात बैलाच्या शर्यती लावून करी तोडण्याचा कार्यक्रमही काही ठिकाणी आयोजित केला होता.