चंद्रपूर Vijay Wadettiwar: लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ब्रम्हपुरी मतदार संघातील सावली तालुक्यातील अनेक विकासकामे ठप्प होती. या विकास कामांना शीघ्र गतीने पूर्ण करुन जनतेच्या समस्या तातडीनं सोडवा, यात हयगय आणि दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, अशी तंबी राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी अधिकाऱ्यांना दिली. ते सावली येथील पंचायत समिती सभागृहात आयोजित आढावा बैठकीत बोलत होते.
पंचायत समिती अंतर्गत राबविण्यात पाणंद रस्ते योजना, घरकुल योजना, अंगणवाडी आणि शालेय वर्ग खोल्या बांधकाम, नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्राम पंचायत भवन इमारत बांधकाम, पाणी पुरवठा अंतर्गत जल जीवन योजना आदी विकासकामे करण्यात येतात. बैठकीत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांची भरती, जिल्हा परिषद सिंचाई विभागाची विकास कामे, वनविभाग, जलसंधारण विभाग, आरोग्य विभाग,भूमी अभिलेख विभागातर्गत सावली शहरातील मोजणी, महसूल विभाग, तालुका क्रीडा संकुल, नगरपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत सुरू असलेली विकास कामांचा आढावा घेण्यात आला. गोसेखुर्द प्रकल्पातर्गत फुटलेली पाईप लाईन, कंत्राटदारांनी केलेल्या चुका, तसेच चुकीच्या ठिकाणी बसविण्यात आलेले वॉल आणि त्यामुळे झालेले शेतकऱ्यांचे नुकसान तथा अन्य योजनांचा विस्तृत आढावा आमदार विजय वडेट्टीवार यांनी घेतला.