नाशिक: विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या दोनशेपेक्षा अधिक जागांवर विजय मिळवून दाखविण्याचा शब्द मी खरा करून दाखवला, असं म्हणत मला हलक्यात घेऊ नका, हलक्यात घेणाऱ्यांचं काय होतं ते अवघ्या महाराष्ट्रानं बघितलय, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरेंबरोबर भाजपा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांनाही गर्भित इशारा दिल्याची चर्चा आहे.
उपमुख्यमंत्री शिंदेंचे जोरदार भाषण : नाशिकमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आभार दौऱ्या दरम्यान जाहीर सभा झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार भाषण केलं. "एक बार कमिटमेंट कर दी तो मै अपने आप की भी नही सुनता" अशी फिल्मी डायलॉगबाजी केली. "गद्दार, खोके असा आरोप करणाऱ्यांना महाराष्ट्राच्या जनतेनं खोक्यात बंद करून बाजूला फेकलं. एकनाथ शिंदे 80 जागा लढला आणि तब्बल 60 जागांवर विजय मिळवला. 15 लाख मते या धनुष्यबाणाला जास्त मिळाली. यातून जनतेनं खरी शिवसेना कोणती? बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे खरे वारसदार कोण? हे दाखवून दिलं त्यामुळेच त्यांचा जळफळाट होत आहे. दिल्लीत शरद पवारांच्या हस्ते झालेल्या माझ्या सत्काराची काही लोकांना पोटदुखी सुरू झाली आहे," अशी टीकाही शिंदे यांनी ठाकरेंवर केली.