उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Reporter) छत्रपती संभाजीनगर Devendra Fadnavis On NCP : "अजित पवार यांनी राष्ट्रवादी वाढवण्यात मोठा वाटा उचलला, मात्र त्यांना पक्षात स्थान मिळणार नाही हे माहीत होतं. सर्वकाही सुप्रिया सुळे यांना भेटणार होतं म्हणूनच ते बाहेर पडले," असा दावा उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. बुधवारी जालना इथं रावसाहेब दानवे यांच्या जाहीर सभेनंतर देवेंद्र फडणवीस संभाजीनगर इथं मुक्कामी थांबले होते, त्यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी हा दावा केला आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांना मानसोपचार तज्ञाची गरज असल्याचा टोला त्यांनी लगावला.
उद्धव ठाकरे यांना चांगला ओळखतो :"प्रादेशिक पक्ष निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये विलीन होतील, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं. त्यावर उद्धव ठाकरे कधीच काँग्रेसमध्ये विलीन होणार नाहीत. मी उद्धव ठाकरे यांना ओळखतो असं, अजित पवार म्हणाले होते. मात्र अजित पवार उद्धव ठाकरे यांना किती ओळखतात हे माहीत नाही. मी त्यांना खूप चांगला ओळखून आहे. त्यांचे मार्गदर्शक शरद पवार आहेत, त्यामुळे ते जे सांगतील तेच उद्धव ठाकरे करतील," अशी टीका देखील देवेंद्र फडणवीस यांनी केली.
उद्धव ठाकरे यांना मानसोपचार तज्ञाची गरज :दोन माकडं भांग पिऊन काम करत आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. त्यावर बोलताना "उद्धव ठाकरे यांचं संतुलन गेलेले आहे. त्यांना मेडिकल मदतीची आवश्यकता आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी मनसोपचार तज्ञ यांची मदत घ्यावी," असं मला वाटतं. "ज्या त्यावेळेस या स्तराला जाऊन एखाद्या पक्षाचा प्रमुख बोलतो, त्यावेळी लक्षात येत आहे की जनतेनं आपल्याला नाकारलं आहे. म्हणून आता शिवीगाळ करण्यावरती उतरलेले आहेत. पण मला असं वाटतं की खरोखर त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. त्या करता एखाद्या मानसोपचार तज्ञांची मदत त्यांनी घ्यावी," असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना दिला.
हेही वाचा :
- विजय वडेट्टीवार पाकिस्तानात...?; देवेंद्र फडणवीसांचा सवाल, ठाकरेंवरही हल्लाबोल - Devendra Fadnavis
- “मी नागपुरी, मला...”, देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना टोला - Devendra Fadnavis
- उद्धव ठाकरेंचे 'हे' शब्द ऐकून बाळासाहेबांच्या आत्म्याला काय वाटलं असेल? देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल - Devendra Fadnavis